"..तो सांगतो, गोवा जगण्यासाठी छान जागा"! दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले प्रेम; गोव्यात खेळणार लीजेंड्स T20 लीग

Harbhajan Singh Goa: पूर्वीच्या तुलनेत येथे आता खूप बदल झालेले असले, तरी प्रत्येकाला प्रिय आहे, त्यातच विशेषतः उत्तर भारतीयांना येथील वास्तव्य जास्त भावते, असे मत या दिग्गज ऑफस्पिनरने व्यक्त केले.
Harbhajan Singh Goa Cricket
Harbhajan Singh Goa CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय क्रिकेट संघात प्रारंभिक टप्प्यावर असताना महान ऑफस्पिनर हरभजन सिंग २६ वर्षांपूर्वी गोव्यात सर्वप्रथम क्लब पातळीवरील क्रिकेट खेळला होता. पूर्वीच्या तुलनेत येथे आता खूप बदल झालेले असले, तरी राज्य प्रत्येकाला प्रिय आहे, त्यातच विशेषतः उत्तर भारतीयांना येथील वास्तव्य जास्त भावते, असे मत या दिग्गज ऑफस्पिनरने रविवारी व्यक्त केले. निमित्त होते, वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० लीग स्पर्धेची पत्रकार परिषद. या स्पर्धेत तो दिल्ली वॉरियर्सचे नेतृत्व करत आहे.

४५ वर्षीय हरभजनने आपला कसोटी संघातील माजी सहकारी डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याचे उदाहरण दिले. भज्जी या टोपणनावाने प्रसिद्ध असलेला फिरकी गोलंदाज म्हणाला, की ‘‘गोव्यात इतर राज्यातील लोक बरेच येतात, त्यात विशेषतः उत्तर भारतीयांचा जास्त भरणा असतो. मी आशिष नेहराचे उदाहरण देईन, त्याने आता गोव्यात बस्तान बसविले आहे. तो आम्हाला नेहमी सांगतो, की गोवा जगण्यासाठी सर्वांत छान जागा आहे.

दिल्लीत भरपूर प्रदुषण आहे हे तुम्ही पाहता. प्रत्येकजण गोव्यावर प्रेम करतो. प्रत्येकासाठी गोवा आपले घरच वाटते.’’ नेहरा हा आपल्या मतदारसंघातील (पर्वरी) रहिवासी असल्याचे यावेळी उपस्थित पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आवर्जून नमूद केले. मार्च २००० मध्ये हरभजन आर्लेम करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळला होता. गोव्यातील ही अखिल भारतीय पातळीवरील तत्कालीन स्पर्धा लोकप्रिय होती.

तेव्हा पंजाबचा आणखी एक महान क्रिकेटपटू युवराज सिंग याच्यासमवेत हरभजन इंडियन एअरलाईन्स संघाचा सदस्य होता. पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत हरभजनच्या संघाला लालचंद राजपूत याच्या नेतृत्वाखालील टाटा स्पोर्टस क्लब संघाकडून तीन विकेटने पराभव पत्करावा लागला होता.

त्या घटनेची आठवण करून दिली असता, १०३ कसोटींत ४१७ विकेट्स घेतलेल्या ऑफस्पिनरने गोव्याविषयी भावना व्यक्त केल्या. तो भारताकडून १९९८ ते २०१६ या कालावधीत खेळला. २३६ एकदिवसीय सामन्यांत २६९ विकेट्स, तर २८ टी-२० लढतींत २५ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत त्याने दोन शतकेही नोंदविली आहेत. गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम पाहण्याबाबत आपण आशावादी असल्याचे मतही हरभजन याने यावेळी व्यक्त केले.

Harbhajan Singh Goa Cricket
Goa Cricket: गोवा क्रिकेट संघात होणार 'मोठा बदल'! नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; आगामी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

गोव्यात खेळला तीन वन-डे!

हरभजन सिंग २००१ ते २००७ या कालावधीत गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (वन-डे) क्रिकेट सामने खेळला आहे. ६ एप्रिल २००१ रोजी ऑस्ट्रेलियाने भारताला चार विकेटने हरविले, तेव्हा त्याची गोलंदाजीतील कामगिरी १०-०-५५-० अशी होती. नंतरच्या दोन्ही वन-डे सामन्यांत भारताला विजय मिळवून देण्यात हरभजनने मोलाचा वाटा उचलला.

Harbhajan Singh Goa Cricket
Goa Ranji Cricket: गोवा क्रिकेटसाठी महत्वाची बातमी! 'हा' धाकड खेळाडू परतला रणजी संघात, चौघांना वगळले; वाचा संपूर्ण यादी..

३ एप्रिल २००६ रोजी भारताने इंग्लंडला ४९ धावांनी हरविले, तेव्हा हरभजनची गोलंदाजीतील १०-१-४७-२ ही कामगिरी निर्णायक ठरली होती. १४ फेब्रुवारी २००७ रोजी झालेल्या लढतीत भारताने श्रीलंकेला पाच विकेट्स राखून पराभूत केले, तेव्हा ‘टर्बनेटर’चा १०-०-३७-२ असा फिरकी मारा अफलातून ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com