Goa News : ‘दाबोळी’चा रिमोट ‘मोपा’कडे!

Goa News : मुख्यमंत्र्यांकडून पाहणी : कामे पूर्ण झाल्याचा दावा; प्रत्यक्षात स्थिती वेगळीच
work Inspection Dabolim airport
work Inspection Dabolim airport Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News : विमानतळ नियंत्रण कक्ष पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे. सध्या मोपा येथूनच बेळगाव आणि कोल्हापूर येथील विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जात आहे. मात्र, उद्‍घाटनानंतर दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळाचे नियंत्रणही ‘मोपा’ वरूनच होईल,

अशी माहिती मुख्यमंत्र्यांसमवेत असलेल्या जीएमआर कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. यामुळे दाबोळी ‘घोस्ट विमानतळ’ होणार तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जीएमआर कंपनीच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आज मोपा विमानतळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पणजी येथील काही माध्यम प्रतिनिधींना सोबत नेले होते. शिवाय पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर, म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा, जीएमआर कंपनीचे जीएमआर कंपनीचे सीईओ रंगनाथन सेशन आदी उपस्थित होते.

‘मोपा विमानतळाचे उद्‍घाटन ८ डिसेंबरनंतर कधीही होऊ शकते. पण ८ तारखेलाच उद्‍घाटन होऊन १० पासून ते जनतेसाठी खुले व्हावे, अशी आपली इच्छा आहे. विमानतळाचे काम ९५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे पाहणीत समोर आले आहे. ‘मोपा’ पूर्णपणे सज्ज असून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तारखेवर उद्‍घाटन अवलंबून आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

‘तो’ निर्णय प्रवाशांचा मोपा विमातळावर विमाने यावीत म्हणून विमान कंपन्यांबरोबर करार करणे जारी आहे. राज्यातील दोन्ही विमानतळ चालू राहाणार आहेत. कुठल्या विमानतळावरील विमानातून जायचे व कुठे उतरणाऱ्या विमानाची तिकिट घ्यायची, हे त्या-त्या प्रवाशांवर अवलंबून असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

संथ कामामुळे आमदारही नाराज!

विमानतळ सज्ज असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी प्रत्यक्ष पाहणीवेळी काम बरेच अपुरे असल्याचे दिसून आले. संपूर्ण विमानतळ लाल धुळीने माखला होता. पत्रकारांना प्रत्यक्षात धावपट्टी सोडल्यास त्यांना काहीच दाखवले गेले नाही.

प्रशासकीय इमारत वगळता इतर सर्व इमारतींचे काम अपूर्ण असून ते पूर्ण करणे युद्ध पातळीवर सुरू असल्याचे दिसून आले. आमदार आर्लेकर, आमदार ज्योशुआ हे देखील संथगतीने होत असलेले काम पाहून नाराज दिसले. कामाच्या प्रगतीबाबत दोघांनीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.

वर्षभरात ४ लाख प्रवाशी

येत्या ११ डिसेंबरपासून डॉमेस्टिक देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येईल व जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल. चार ते पाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी बोलणी झालेली आहे. एका वर्षात सुमारे ४ लाख प्रवाशी हाताळले जातील, अशी माहिती जीएमआर कंपनीचे सीईओ रंगनाथन सेशन यांनी दिली.

उद्‍घाटनानंतर उर्वरित कामे पूर्ण

मुख्यमंत्र्यांनी फक्त सुशोभिकरणाचे काम बाकी आहे, असे म्हटले असले तरी सावर्डेतील नर्सरीमधून मागवलेली सुमारे ५ लाख रोपटी लावणे बाकी आहेत. पाण्याअभावी ती कोमेजत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे उद्‍घाटनानंतर हळूहळू सर्व कामे पूर्ण होतील. मोपा लिंक रोडचे काम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने कामाच्या दाव्याबाबत अस्पष्टता दिसून आली.

दोन दिवसांत नियुक्तीपत्रे

नोकऱ्यांत मोपावासीय आणि पेडणेतील युवकांना प्राधान्य दिले आहे. दोन दिवसानंतर स्थानिक आमदार दोनशे पेडणेकरांना कामाची नियुक्तीपत्रे देतील. विमानतळाचे नामकरण काय करावे, हे केंद्र सरकारवर अवलंबून आहे.

त्याचा निर्णय लवकरच होईल. तसेच जमीन मालकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. ज्यांच्या कागदपत्रात घोळ होता, त्यांची प्रक्रिया बाकी आहे. पण हा प्रश्‍नही लवकरच सुटेल. ज्यांचे काही प्रश्‍न अजून असतील तेही लवकरच सोडवले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com