(सपना सामंत)
महिला...महिला म्हणून तिचे समाजात स्थान कुठे आहे, हे शोधणे तितके सोपे नाही. आज प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात नाव मिळवून उंच भरारी घेत आहे. समाजात वावरताना काही सर्वांच्या प्रकाशझोतात येतात तर काही पडद्यामागे राहून काम करत असतात.
महिलांना आयुष्यात खूप काही करायचे असते, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहनाची गरज आहे. दारिद्र्य व आधार नसल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कित्येक महिला कुटुंबाचा आधार बनून आपला उदरनिर्वाह करत असतात. अशीच एक महिला म्हणजे देऊळवाडा-पिसुर्ले येथील दीपाली दामोदर परवार होय.
लहानपणापासून गरिबीतून वर आलेली आणि लग्न झाल्यानंतरही गरिबीतच दिवस काढावे लागणाऱ्या दीपाली यांचा मुख्य व्यवसाय बाबूंपासून हस्तकला तयार करण्याचा. ही कला तिने आपल्या बालपणीच आत्मसात केली. त्यानंतर लग्न झाल्यानंतर हळूहळू ती त्यात रमून गेली.
घरची परिस्थिती हलाखीची, त्यात पती काही वर्षांपासून आजारी. त्यामुळे घरची सर्व जबाबदारी तिच्यावर पडली. पदरी तीन मुले. कसाबसा संसाराचा गाडा ती ओढत आहे.
काही वर्षांपूर्वी बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये स्वच्छता कामगार म्हणून ती कामाला होती. मात्र पती आजारी पडल्याने तिला नोकरी सोडावी लागली. त्यामुळे कुटुंबावर मोठे संकट आले.
सध्या दीपाली बाबूंपासून अनेक कलाकृती तयार करत आहे. त्यात पाटले, सुपे, दाळी, लग्न कार्यासाठी लागणाऱ्या वस्तू, फुलदाणी व इतर शोभेच्या वस्तूंचा समावेश आहे. तिला खूप काही करायचे आहे.
मात्र आर्थिकदृष्ट्या पाठबळ नसल्याने ती खचून गेली आहे. बातचीत केली असता ती म्हणाली, आजपर्यंत कोणाकडून कुठलीच मदत मिळालेली नाही. मदतीची खूप गरज आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट
आपल्या कष्टाच्या जोरावर दीपाली मुलांना चांगले शिक्षण देत आहे. नुकतीच तिची मुलगी परिचारिका बनली आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात आर्थिक आधार मिळत असल्याची ती सांगते.
भुईपाल गावचे सूर्यकांत गावकर हे वेळोवेळी मदत करतात. त्याचबरोबर बांबूचे साहित्य व माडाच्या झावळांचे (चुडतांचे विण) वेगवेगळ्या कलाकृती करण्यासाठी तिला सांगतात. आता घरी काही प्रमाणात ऑर्डर येतात.
मात्र त्या पुरेशा नाहीत. सरकारच्या अनेक योजना आहेत म्हणे, मात्र अजूनही त्या आपल्याला अवगत नाहीत, असे ती म्हणते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.