(पौर्णिमा केरकर)
परिस्थितीसमोर हतबल न होता तिला बेधडक सामोरे जाणारी व्यक्तिमत्त्वेच काळाच्या पटलावर नाव कोरतात. आशाताई सावर्डेकर हे असेच नाव! चापल्य, उत्साह, चैतन्य, समाजभान आणि मायेचं हिरवं रान म्हणजे आशाताई!
उच्च विद्याविभूषित अशा कुटुंबातील त्यांचा जन्म. पूर्वाश्रमीच्या आशा विनायक कैसरे. माहेरहून समाजसेवेचा वारसा, तर सासरची देशभक्ती यांचा समन्वय जरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक असला तरीही त्यांची स्वतःची बौद्धिक, वैचारिक उंची गोमंतकीयांचा स्वाभिमान आहे.
लग्नापूर्वीच त्यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले. कीर्तीचक्राने सन्मानित गोमंतकीय विंग कमांडर विश्वनाथ सावर्डेकर यांच्याशी विवाह झाल्यावर त्यांची भ्रमंती सुरू झाली. दोन मुली आणि देशासाठी झोकून देऊन काम करणारे पती. सर्व काही सुरळीत असतानाच विमान अपघातात पतिदेवांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आशाताईंच्या तरुण मनावर झालेला हा खूप मोठा आघात होता. त्यांच्या जागेवर एखादी दुसरी व्यक्ती असती तर हतबल, असाहाय्य झाली असती. आशाताईंच्या जगण्याचा हेतू स्पष्ट होता. त्यांचे जीवन समाजासाठी समर्पित होते. ते त्यांनी सुरूच ठेवले.
स्वतःचे जीवन कसे जगावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. जीवनात एखादं उच्च शिखर गाठायचे असेल तर ती चढण चढण्यासाठीचे श्रम आपणच करायचे. शिखर स्वतःहून खाली झुकून तुमच्या पायापर्यंत येणार नाही. पावलात गोळे आले, तरीही चढण चढावीच लागणार. तो तुमचा संघर्ष असतो. तो संघर्ष स्वतःच्या जगण्यासाठी असू दे अथवा सभोवतालला जगविण्यासाठी!
फरक असतो तो वृत्तीत आणि कृतीत. स्वतःला जगविताना आपण स्वत:भोवती कुंपण घालतो. विचारांना मर्यादा येते आणि पुढील प्रवाह थांबतो. परंतु सभोवताल जगवताना मात्र स्वतःच्या जगण्याच्या कक्षा विस्तारतात. आपणच आपल्याला नव्याने कळू लागतो!
‘संजीवन’ संस्थेच्या संचालक आशाताई सावर्डेकर यांनी पती निधनानंतर खचून न जाता दोन मुलींच्या पालकत्वाची जबाबदारी हिमतीने पार पाडलीच, त्याबरोबरच समाजाला सशक्त योगदान दिले.
समाजशास्त्र या विषयातील डॉक्टरेट, त्याशिवाय वकिलीचे शिक्षण. देश-विदेशातील शिक्षणामुळे त्यांची स्वत:ची विचारधारा विकसित होतीच. आज वयाची आठ दशके त्यांनी ओलांडली आहेत, तरीही उत्साहाने कार्य करतात.
मानवी जन्म हा फक्त स्वतःचे कुटुंब सजविण्यासाठी नसून असाहाय्य पीडित, गरजवंतांचे संसार उभे करण्यासाठी आहे, ही त्यांची कायमची धारणा आहे. आशाताईंकडे आहे एक उत्साही तरुण मन, अभंग जिद्द आणि त्याही पलीकडील काळाकडे पाहण्याची दृष्टी.
जीवनात कुणी कुणाचा दिवा होतो, तर कुणी कोणाला दुवा देतो. प्रेमाने पाठीवरून हात फिरविणारे ऊबदार हात अभावानेच मिळतात. सभोवताली वाटांची गुंतवळ असते. त्यातून आपली वाट शोधायची असते. ती एकदा गवसली की, जगण्याचा गुंता होत नाही. कारण त्यात माणसांची गुंतवणूक असते.
सामाजिक बांधिलकी असते. मुख्य म्हणजे जगण्याचे नितळ भान त्यात सामावलेले असते, हे भान आशाताईंकडे आहे. म्हणून आता या वयातही त्या सभोवताल कवेत घेत जगण्याचा महोत्सव साजरा करतात.
मुलींसाठी नर्सिंग प्रशिक्षण
‘संजीवन’ संस्था चालविताना महिलांच्या वृद्धत्वाला नवजीवन तर दिलेच, शिवाय समाजाची आजची निकड म्हणून याच संस्थेतर्फे मुलींना नर्सिंगच्या प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. आशाताईंना बदलत्या जीवन पद्धतीचे भान आहे. त्यामुळेच तर आताच्या काळाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना सोडविण्यासाठी त्या सतत कार्यरत आहेत.
समाजभान जागविणारी साहित्य संपदा
सामाजिक समरसता, व्यसनमुक्ती, निसर्ग सौंदर्य अबाधित राखण्यासाठी विविध उपक्रम राबवून समाजमनात जागृतीचे कार्य त्या सातत्याने करत आहेत. त्यांच्याकडील अनुभवाची शिदोरी फार मोठी आहे. ग्रामजीवन, पर्यावरण, समाजभान जागविणाऱ्या पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली आहे.
ग्रामीण विकासाची सुदृढ संकल्पना
मानसिक आरोग्य, समृद्ध वृद्धत्व, युवा विकास, पर्यावरण समस्या, सर्जनशील ग्रामीण विकास ही आशाताईंनी नुसती स्वप्नच पाहिली नाहीत, तर ती वाचन, मनन, चिंतन, लेखनातून प्रत्यक्षातही उतरवली. गावांच्या विकासात देशाची समृद्धी असते. त्यासाठी वेगाने शहरीकरणाकडे झेपावणाऱ्या ग्रामीण भागासाठी विकासाचा आराखडा त्यांनी मांडला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.