गोव्यात महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्समध्ये वाढ होत असल्याने उद्योजकतेत महिलांची प्रचंड क्षमता आणि प्रतिभा दिसून येते. महिलांनी सुरू केलेली सुमारे 33 टक्के स्टार्टअप असून उद्योगात त्यांचे वगळे स्थान निर्माण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पना केलेल्या ‘नारी शक्ती’ सारख्या उपक्रमांनी महिलांना अधिक सक्षम केले आहे,असे मत माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पणजीतील गोवा मनोरंजन संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान खात्याच्या संचालक यशस्विनी बी., स्टार्टअप आणि माहिती तंत्रज्ञान प्रोत्साहन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. प्रशांत व इतर मान्यवर उपस्थित होते.
माहिती, तंत्रज्ञान, इलेक्ट्रोनिक्स आणि जनसंपर्क खाते, गोवा सरकारकडून महिला उद्योजकांच्या समर्पित प्रयत्नांची आणि उल्लेखनीय प्रतिभेची ओळख म्हणून, महिलांचा सत्कार सोहळा झाला. एएसआयईआर सोल्युशन्सच्या सुनाया शिरोडकर, आय - असिस्टच्या सुप्रिया मल्लाड, ब्लर्ब कन्सल्टन्सीच्या सपना सहानी, गोएनकार्ट डिजिटल वर्ल्डच्या रफीनाबी शेख आणि मेक इट हॅपनच्या मारिया व्हिक्टर यांचा मंत्री खंवटे यांच्या हस्ते सत्कार झाला.
225 स्टार्टअप्सपैकी 76 च्या महिला संस्थापक
स्टार्टअप परिसंस्थेमध्ये नावीन्य आणि विकासाला चालना देण्यासाठी महिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 225 नोंदणीकृत स्टार्टअप्सपैकी 76 महिला संस्थापक किंवा सह-संस्थापक आहेत. महिलांनी तंत्रज्ञान उद्योग आणि स्टार्टअप परिसंस्थेमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे, अशी माहिती तंत्रज्ञान संचालक यशस्विनी बी यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.