जे बदलते ते टिकते व जे स्थिर राहते ते टाकऊ बनते’ हा निसर्गाचा नियम. काळानुरूप आपण बदलायलाच हवे. शिक्षण क्षेत्रात आता मोठा बदल घडून येत असून नवीन धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी व्हायला लागली आहे.
‘मुलांपेक्षा पालक व शिक्षक जास्त प्रॉब्लेमेटिक असतात’ असे एका विद्वानाचे म्हणणे आहे व ते काही अंशी बरोबर आहे. जेव्हा ‘एनईपी’ची अंमलबजावणी जाहीर झाली, तेव्हा शाळेच्या वेळेत बदल होणार असे सांगण्यात आले. त्यामुळे या धोरणाला पहिल्यांदा कोणी विरोध केला तर शिक्षकांनी. शाळेच्या वेळेत बदल करण्यात व सकाळी आठ ते दुपारी दीड या वेळपेक्षा पाच मिनिटे जास्त शाळेत राहणे अन्यायकारक असल्याचा दावा कोणी केला, तर तो शिक्षकांनीच. गेल्या दोन दशकांपासून झोपून असलेली माध्यमिक शिक्षक संघटना अचानक जागी झाली व नवीन शैक्षणिक धोरण शिक्षकविरोधी असल्याचा दावा करू लागली.
याबाबत शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक कृ. प्रियोळकर यांनी सांगितले की, शिक्षकांनी आपली मानसिक तयारी करून धोरणातील त्रुटी शिक्षण खात्याच्या नजरेस आणून द्याव्यात. काळानुसार बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. मुलांना समजून घेत त्यांची काळजी घेतली पाहिजे. मुलांचे योग्य पालनपोषण करणे, त्यांच्या चांगल्या वाढीसाठी वातावरण निर्मितीची जाण असणे, मायेच्या स्पर्शाच्या माध्यमातून त्यांना जवळ करणे, कौटुंबिक स्तरावर सर्व सदस्यांना एकत्रित नात्यात बांधून ठेवण्याचे कामही शिक्षकांनी केले पाहिजे.
खरे म्हणजे या नव्या धोरणामुळे शिक्षकांपुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. कोणतीही पूर्व तयारी न करता गेल्या वर्षी जे मागच्या बॅचला शिकविले, तेच नवीन बॅचच्या माथी मारण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. शिक्षकांपुढे सर्वांत मोठे आव्हान असणार आहे ते विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न बनविता ज्ञानार्थी बनविण्याचे. आता शिक्षकांनी ‘अपडेट’ व्हायलाच पाहिजे, असेही प्रियोळकर यांनी सांगितले.
राज्यातील अनेक सरकारी तसेच खासगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक हे तासिका, कंत्राट तसेच अर्धवेळ तत्त्वावर कार्यरत असतात. असे प्रकार तसेच अशा प्रकारची शिक्षण खात्याची भरती ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मारक ठरते. शिक्षक आपल्या कार्याला योग्य न्याय देऊ शकत नसल्याची चिंता अनेक शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक व्यक्त करतात.
कंत्राटी तसेच तासिका तत्त्वावर असलेल्या शिक्षकांबाबत विचारले असता शिक्षण उपसंचालक सिंधू प्रभुदेसाई म्हणाल्या की, शिक्षणाबाबत कोणतीच तडजोड केली जात नाही. शिक्षण संचालनालय स्वतः लक्ष देऊन काम करवून घेते. राज्यातील कंत्राटी तत्त्वावर असलेल्या शिक्षकांना पूर्ण वेतन मिळते. त्यांना रजेच्या दिवसांचेही वेतन मिळते. परंतु जे शिक्षक तासिका तत्त्वावर आहेत, त्यांना मात्र तासाप्रमाणे वेतन दिले जाते. ते संध्याकाळपर्यंत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे तासिका, कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताच प्रभाव पडत नाही. काही शिक्षक असेही आहेत जे स्वतःहून विद्यार्थ्यांसाठी हिरिरीने कार्यरत असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, असेही त्या म्हणाल्या.
याबाबत शिक्षणतज्ज्ञ प्रा. अनिल सामंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, निश्चितच शिक्षक हा पूर्णवेळ असावा, जेणेकरून तो मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल. तसेच विद्यार्थ्यांना योग्य न्याय देऊ शकेल, त्यांच्याकडे योग्य पद्धतीने लक्ष देऊ शकेल. परंतु आता आर्थिक तसेच अन्य कारणांमुळे तासिका, कंत्राटीतत्त्वावर शिक्षकांची भरती केली जाते हा भाग वेगळा. मात्र मला वाटते की शिक्षक हा पूर्णवेळच असावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.