
पणजी: खगोलप्रेमींसाठी एक रोमांचक बातमी समोर आलीये. रविवार (दि.७) रात्री आकाशात एक अविस्मरणीय खगोलीय घटना घडणार आहे. रात्रीच्या वेळी पौर्णिमेचा चंद्र पूर्णपणे लाल रंगाचा दिसेल, ज्याला 'ब्लड मून' किंवा 'रक्तचंद्र' म्हणतात. ही घटना पाहण्यासाठी गोव्यातील खगोलशास्त्रज्ञ आणि हौशी निरीक्षक अत्यंत उत्सुक आहेत. सुमारे पाच तासांच्या या अनोख्या सोहळ्यात, संपूर्ण ग्रहणाची स्थिती ८२ मिनिटे टिकणार आहे.
गुरुवारी रात्री ८ वाजून ५८ मिनिटांनी चंद्र ग्रहणाला सुरुवात होईल. यानंतर, रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी खंडग्रास स्थिती दिसेल. सर्वात आकर्षक आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'रक्तचंद्राची' स्थिती. रात्री ११ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत चंद्र पूर्णपणे लालसर रंगात दिसेल. यानंतर, पहाटे २ वाजून २५ मिनिटांनी हे ग्रहण पूर्णपणे संपेल. या संपूर्ण वेळेत, जर हवामान अनुकूल असेल तर, आकाशात स्पष्टपणे दिसणारा हा सोहळा पाहता येईल.
चंद्राला लाल रंग येण्यामागे एक रोचक वैज्ञानिक कारण आहे. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा पृथ्वीची गडद सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्र दिसेनासा झाला पाहिजे, असे आपल्याला वाटू शकते. पण, असे होत नाही.
पृथ्वीच्या वातावरणातून सूर्यप्रकाश गाळून चंद्रावर पोहोचतो. या प्रक्रियेत, वातावरणातील कण निळ्या-जांभळ्या रंगाच्या किरणांना विखुरून टाकतात, पण लाल रंगाची किरणे चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात. यामुळेच चंद्र लालसर रंगाचा दिसतो आणि त्याला 'रक्तचंद्र' असे नाव पडले आहे.
सूर्यग्रहणाप्रमाणे चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही विशेष साधनांची किंवा संरक्षणाची गरज नसते. ही खगोलीय घटना डोळ्यांनी पाहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. जर तुम्हाला चंद्राचे अधिक स्पष्ट आणि जवळचे दृश्य पाहायचे असेल, तर तुम्ही दुर्बिणी किंवा टेलिस्कोपचा वापर करू शकता.
ही एक दुर्मिळ खगोलीय स्थिती आहे, कारण चंद्र आणि पृथ्वी यांच्या कक्षांमध्ये थोडासा तिरकसपणा असल्यामुळे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत येणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे आज रात्रीच्या या संधीचा लाभ घेऊन या अविस्मरणीय सोहळ्याचा अनुभव नक्की घ्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.