South Goa : दक्षिण गोव्‍यासाठी काँग्रेस महिला उमेदवार देणार का? चर्चेला ऊत

South Goa : २० पैकी १८ मतदारसंघांत महिलांचीच संख्‍या जास्‍त
South Goa
South Goa Dainik Gomantak

South Goa :

मडगाव, दक्षिण गोव्‍यात भाजपतर्फे यंदा महिला उमेदवार उभी केली जाणार, असे सांगितले जात असताना त्‍यांना तोडीस तोड उत्तर देण्‍यासाठी काँग्रेसही महिला उमेदवार उभा करणार का, असा प्रश्‍न सध्‍या विचारला जात आहे.

याचे कारण म्‍हणजे, दक्षिण गोव्‍यातील २० विधानसभा मतदारसंघांपैकी १८ मतदारसंघांत महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्‍त असून पूर्ण लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा १८,५७५ ने जास्‍त आहे.

महिलांना प्रतिनिधित्‍व देण्‍यासाठी भाजपकडून यावेळी दक्षिण गोव्‍यात महिला उमेदवार देणार, हे निश्‍चित मानले जात असून पल्‍लवी धेंपे यांनाच ती उमेदवारी मिळणार असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसही दक्षिण गोव्‍यातून महिला उमेदवार उभा करणार का आणि तसा निर्णय घेतल्‍यास काँग्रेसकडे सक्षम महिला उमेदवार आहे का, हा प्रश्‍न विचारला जाताे.

दक्षिण गोव्‍यात काँग्रेसकडे काही चांगल्‍या महिला उपलब्‍ध असल्‍या तरी त्‍या निवडून येणार का, हाच खरा प्रश्‍न आहे, अशी प्रतिक्रिया एका काँग्रेस कार्यकर्त्यानेच व्‍यक्‍त केली.

महिला उमेदवाराला उमेदवारी द्यायची झाल्‍यास महिला काँग्रेसच्‍या अध्‍यक्ष बीना नाईक हेच नाव सध्‍या डोळ्‍यांसमोर येते, असे त्‍यांनी सांगितले. प्रतिमा कुतिन्‍हो या दुसऱ्या उमेदवार होऊ शकतात. मात्र, त्‍या अजून काँग्रेसमध्‍ये परत आलेल्‍या नाहीत.

दक्षिण गोव्‍यात एकूण २० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्‍यातील फोंडा व वास्‍को हे दोन मतदारसंघ वगळल्‍यास आणि १८ मतदारसंघांत महिला मतदारांची संख्‍या पुरुषांपेक्षा अधिक आहे.

फोंड्यात पुरुष मतदारांची संख्‍या महिला मतदारांपेक्षा फक्‍त १६५ तर वास्‍को मतदारसंघात ती महिलांपेक्षा ६९८ एवढीच जास्‍त आहे. काँग्रेसचा बालेकिल्‍ला म्‍हणून ज्‍या सासष्‍टी तालुक्‍याकडे पाहिले जाते त्‍या सासष्‍टी तालुक्‍यातील आठही विधानसभा मतदारसंघांत महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा बरेच अधिक आहे.

South Goa
Goa Lok Sabha Election: भाजपकडून दक्षिण गोव्‍यात महिला उमेदवाराच्‍या घोषणेची औपचारिकता बाकी

महिलांना आरक्षण मिळूनही समस्‍या सुटणार नाहीत

१ महिलांना राजकीय आरक्षण मिळत नसतानाही दक्षिण गोव्‍यातून भाजप महिला उमेदवार उभा करत असेल तर त्‍या निर्णयाचे स्‍वागत करावेच लागेल, अशी प्रतिक्रिया पंचायत महिला शक्‍ती अभियानाच्‍या माजी अध्‍यक्ष आणि दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायतीच्‍या माजी अध्‍यक्ष नेली रॉड्रिग्स यांनी व्‍यक्‍त केली. मात्र, जोपर्यंत ही उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत भाजप महिलेला खरेच उभे करेल की नाही, ही शंका दूर होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

२ गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना रॉड्रिग्स म्‍हणाल्‍या की, येत्‍या विधानसभा निवडणुकीत महिलांना ३० टक्‍के राजकीय आरक्षण मिळणार, असे सांगितले जाते. महिला सबलीकरणासाठी असा निर्णय घेणे आवश्‍‍यक आहेच.

मात्र, आरक्षण मिळाले तरीही पात्र महिलांना आमचे पक्ष उमेदवारी देतील की नाही, ही शंका आहेच. कारण सध्‍याच्‍या राजकीय व्‍यवस्‍थेवर पुरुषांचे एवढे वर्चस्‍व आहे की आपले वर्चस्‍व जाऊ नये यासाठी ते आपल्‍या स्‍वकीय असलेल्‍या महिलांनाच पुढे आणतील आणि त्‍यामुळे आमच्‍यासारख्‍या पात्र महिला उमेदवार नेहमीप्रमाणे बाजूला राहतील, अशी शंका आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com