Panjim Yog Setu: राजधानीत स्मार्ट सिटी आणि गोवा साधनसुविधा महामंडळद्वारे ‘तपोलोक : योग क्षेत्र’ हा प्रकल्प साकारण्यात येत असून जागतिक योगदिनाचे औचित्य साधत त्याचे घाईगडबडीने उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. येथे असलेला भगवान परशुरामाचा पुतळा समाजमाध्यमावर व्हायरल होताच पर्यटकांची या स्थळाला भेट देण्याची संख्या वाढली. मात्र, येथील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. असे असताना सरकारने घाईघाईने या प्रकल्पाचे उद्घाटन का केले, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
गोवा मनोरंजन सोसायटीच्या समोरील मांडवी किनाऱ्यावर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. ज्यात सिंहद्वार, योग सेतू, योगस्तंभ, योग दालन, योग मंडळ, योग पथ, प्राणायाम क्षेत्र, अस्थान योग क्षेत्र आणि भगवान परशुरामाचा पुतळा यांचा समावेश आहे.
गेल्या बुधवारी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले असले तरी बहुतांश कामे अर्धवट आहेत. परशुरामाचा पुतळा पुन्हा बांबूने झाकला असून त्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पात बसविण्यात आलेल्या फरशाही अस्ताव्यस्त विखरल्या आहेत.
परशुरामाकडे जाणारा मार्ग बंद
नेत्यांसह नेटकऱ्यांनी समाजमाध्यमावर परशुराम पुतळ्याचे फोटो शेअर केले. नदी किनाऱ्यावर उभी असलेली ही मूर्ती अनेकांना आकर्षित करते. त्यामुळे या स्थळाला भेट देण्याची उत्सुकता वाढलेली असणारच. म्हणून गेल्या काही दिवसांपासून हा प्रकल्प पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत.
परंतु राज्यातील विविध भागातून ‘तपोलोक योग क्षेत्र’ पाहण्यासाठी येणारे नागरिक निराश होऊन परतताना दिसत आहेत. कारण, भगवान परशुरामांच्या पुतळ्याकडे जाणारा रस्ता बंद केलेला आहे. तसा फलक लावण्याची तसदीही संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदाराने घेतलेली नाही.
प्रकल्पाला पावसाचा फटका
मॉन्सूनला सुरवात होऊनही पावसाचा जोर मंदावला होता; परंतु शनिवारपासून आलेल्या पावसाचा फटका या प्रकल्पातील कामांना बसला असून बहुतांश कामांची पुन्हा डागडुजीही कामगारांकरवी करण्यात येत आहे.
गेल्या रविवारी येथे कामगार व सुरक्षारक्षक नव्हते, त्यामुळे महागडे साहित्य तसेच पडून राहिल्याने सरकारला याची काहीच काळजी नाही का, असा सवालही उपस्थित होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.