Goa News: पणजी शहर हे स्मार्ट शहर आहे, मात्र या स्मार्ट शहरातील रस्ते स्मार्ट नसल्याने ते स्मार्ट होण्याच्या प्रतीक्षेत पणजीतील स्थानिक आणि पणजीत कामासाठी कर्मचारी आहेत. दुरूस्ती केल्यानंतर काही दिवसातच पुन्हा खड्डे निर्माण होतात, या प्रकाराला नागरिक कंटाळले असून पणजीतील रस्ते हॉटमिक्स कधी होणार? असा सवाल ते करीत आहेत.
संबंधित विभाग झोपल्याचे आरोप झाल्यानंतर विभागाला जाग येते आणि लोकांना दाखविण्यासाठी काही खड्डे बुजविले जातात, पण प्रत्यक्षात कृती शून्यच राहते. पावसाळा संपला, तरीही खड्डे दुरुस्ती झाले नाहीत. उलट दररोज नवे नवे खड्डे निर्माण होत आहेत.
चतुर्थीपूर्वी चकाचक होणार रस्ते दसर-नवरात्रोत्सव उद्यापासून सुरू होत असूनही ‘खड्ड्यांची स्थिती जैसे थे’ आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात, गरबा, दांडियासाठी जाणाऱ्यांना रस्ता शोधत जावे लागणार, वाहने हाकतानासुद्धा काळजीपूर्वक जावे लागले, असे पणजीकरांचे मत आहे.
काही ठिकाणी सिमेंट क्रॉंक्रिटने खड्डे बुजवून पॅचवर्क उपाय शोधून काढला आणि काही ठिकाणी खड्डे बुजविले. हा तात्पुरता दिलासा लोकांना दिला असला तरी विभागाची ही खेळी लोक जाणून आहेत. गेले वर्षभर स्मार्ट सिटी रस्त्यांचे काम करत आहे आणि त्यासाठी पणजीत रस्ते देखील बंद होते. निदान ते पुन्हा खुले करताना कायमस्वरूपी खुले राहतील, अशीच अपेक्षा लोकांनी केली होती, परंतु वारंवार या रस्त्यांवर काम होत असल्याने लोकही नाराज होत आहेत.
पणजी शहरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री देखील शहरात प्रवास करत असतात. तरीही लोकांना चांगली सुविधा देण्याची सरकारची योजना सत्यात उतरत नाही.
भाजपच्या मुख्यालयासमोर असलेला रस्ताही दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे, पण तरीही तो दुरुस्त केला जात नाही. सरकार लोकांना पायाभूत सुविधा देण्यास मागे का पडत आहे, असा प्रश्न लोक विचारू लागले आहे.
पणजी शहर हे स्मार्ट शहर होणार, हे जे स्वप्न सरकारने लोकांना दाखविले होते, ती केवळ एक अफवा आहे, असा समज आज जनतेमध्ये निर्माण होऊ लागला आहे. स्मार्ट सिटीत स्मार्ट सुविधा मिळणार? अशी अपेक्षा लोकांनी केली होती, मात्र पणजी शहराची स्थिती पाहून लोकांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत.
राज्यातील अनेक रस्तेही असेच खड्डेमय असून पर्वरी,रायबंदरकडून पणजीत येतानाही खड्ड्यातून, वाहतूक कोंडीतून यावे लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.