शिक्षणात काय आहे, काय नाही?

माहितीचे स्रोत दाही दिशांतून मुलांवर आदळत आहेत. त्यातून ज्ञानाची निर्मिती किती व कशी होते, हे पाहणे आवश्यक आहे. त्याविरुद्ध तक्रार करत बसण्याऐवजी त्यातून मार्ग काढला पाहिजे. अभ्यासक्रमाबाहेरील पण, अभ्यासाशी संलग्न असलेली अवांतर माहिती, मूल किती व कशी गोळा करत आहे, याचे आकलन पालकांनी केले पाहिजे. त्यानुसार शिक्षण व्यवस्थेत काय बदल आवश्यक आहेत, याविषयी व्यक्त झाले पाहिजे.
Goa Education
Goa EducationDainik Gomantak

नारायण भास्कर देसाई

आपल्या शिक्षणाविषयी मान्य व्यक्ती म्हणून आपण कितीसा विचार करतो, किंवा आपल्या रोजच्या जीवनात शिक्षणव्यवस्थेबाबत आपण काही विचार, निरीक्षणे, मते जाहीरपणे वा आपल्या परिचितांपुरती, सहकाऱ्यांशी मांडतो का? शिक्षणात काम करणारे तरी किती लोक असा प्रयत्न करतात? शिक्षणप्रक्रियेत सक्रिय असलेले, शिक्षणव्यवस्थेत सहभाग असलेले, शिक्षणयंत्रणेचा भार पेलणारे यांच्याकडून तर ही अपेक्षा जास्त असणे स्वाभाविक आहे.

एकविसाव्या शतकातील शिक्षण कसे असेल, कसे असावे याबाबत आपापल्या स्तरावर, आपापल्या परिघात विचार होणे हे आपल्या सामाजिक विकासाचे लक्षण ठरावे. समाजासमोरचे प्रश्‍न समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याचे आव्हान शिक्षणाने पेलावे, ही माफक अपेक्षा अस्थानी ठरू नये.

आजच्या युगात स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यांच्या शोधात जगभर विविध प्रकारे चर्चा सुरू आहे. संपत्तीचे उत्पादन आणि वितरण यातून समाजात न्याय आणि स्थैर्य आणायच्या मार्गावरील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नव्या युगात अर्थव्यवस्थेचा भार ज्ञानावर आहे. म्हणून ज्ञाननिर्मिती, माहितीचे वितरण यांनी आपले पूर्ण जीवन व्यापले आहे.

Goa Education
ABHA CARD : येत्या तीन महिन्यांत सर्वांना आभा कार्ड : आरोग्य सचिव

शिक्षणव्यवस्थेने या बाबतीत काय बदल केले, त्यासाठी कोणती साधने स्वीकारली, कोणती तंत्रे आत्मसात केली, हे शिक्षणक्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला घटक म्हणून, शिक्षकाने शोधायचे तर आहेच, पण त्या बदलांचा प्रेरक आणि चालकही व्हायचे आहे. कोणतीही शिक्षणव्यवस्था उपलब्ध करून देते त्या शिक्षणाची गुणवत्ता त्या व्यवस्थेतील शिक्षकांच्या गुणवत्तेपेक्षा जास्त असू शकत नाही, असे म्हणतात त्याचे कारण हेच.

आज सत्तेची मुळे ज्ञानात आहेत, आणि माहितीचा वापर, प्रसार करणारेच सत्तेशी सख्य सहज करू शकतात. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा गाभाच जर ज्ञान असेल, तर राजकीय प्राधान्यक्रमात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सर्वाधिक महत्त्वाचे ठरते.

स्वातंत्र्यात मुक्त अभिव्यक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते जाणूनच तर संपत्ती निर्माण करणारी माध्यमे आपल्या ताब्यात ठेवून माहितीचे वितरण नियंत्रित करण्याची व्यवस्था हा सर्वाधिक महत्त्वाचा राजकीय मुद्दा ठरतो. शिक्षणाने या बाबतीत काय करावे? शिक्षणातील लोकांना काय शक्य आहे? असे प्रश्‍न साहजिक. थोडा विचार केला तर नवीन शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करू यावर बरेच काही अवलंबून आहे, असे दिसून येईल.

पन्नास वर्षांमागे सामाजिक विचारवंत ऑल्विन टॉफलर यांचे ‘फ्यूचर शॉक’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हा अनेकांची झोप उडाली. पुढच्याच दशकात त्यांनी मानवी संस्कृतीची प्रगती उलगडून दाखवणारे ‘थर्ड् वेव्ह’ हे पुस्तक लिहिले आणि १९९० मध्ये ‘पॉवरशिफ्ट्’मधून एकविसाव्या शतकातील समाजकारण, अर्थकारण, राजकारणाचे चित्र रेखाटले. आपल्या पुस्तकात ते म्हणतात - सामाजिक न्याय आणि स्वातंत्र्य ही दोन्ही आता वाढत्या प्रमाणात जर कशावर अवलंबून राहणार असतील तर ते म्हणजे प्रत्येक समाज तीन बाबी कशा हाताळतो यावर. यातील पहिली बाब आहे शिक्षण, दुसरी माहिती तंत्रज्ञान आणि तिसरी म्हणजे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य.

Goa Education
Opa Pipeline Leakage: 'ओपा'ला जोडलेली एक मुख्य पाईपलाईन फुटली; लाखो लीटर पाणी वाया...

माहिती तंत्रज्ञानाने जगभरातील माहिती आपल्याला चुटकीसरशी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करून दिली. केवळ माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञानाची निर्मिती माहितीच्या आधारे करण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते, तशीच शिक्षणातही. विविध स्वरूपात आणि विविध प्रकारची माध्यमे आपल्या जगण्यातील एकेका क्षणावर प्रभाव टाकत आहेत, बरा-वाईट परिणाम करत आहेत, आपले मानस आणि आपले वर्तन बदलण्यात माध्यमांचा खूप मोठा वाटा आहे, हे आपल्याही सहज लक्षात येते. आणि माध्यमांमुळे आपली मुले बिघडली अशी तक्रार आपण पालक, शिक्षक म्हणून उठता-बसता करत असतो.

टॉफलरने त्याच्या १९९०च्या पुस्तकात केलेले एक विधान या बाबतीत आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. त्याने म्हटले होते - नवीन प्रसार माध्यम व्यवस्थेची सहा तत्त्वे आणि उद्याची शिक्षण व्यवस्था यांच्यातील अंतर्संबंधांचा शोध घेणे आवश्यक आहे. ही सहा तत्त्वे म्हणजे आंतर क्रियात्मकता (इंटरॅक्टिव्हिटी), गमनशीलता (मॉबिलिटी), रूपांतरणीयता (कन्व्हर्टिबिलिटी), संयोजकता (कनेक्टिव्हिटी), सर्वव्यापकता (युबिक्विटी) आणि वैश्वीकरण (ग्लोबलायझेशन).

यातील प्रत्येक तत्त्व महत्त्वाचे. प्रसारमाध्यमांचा प्रभाव आपल्या तना-मनावर आणि जन-मानसावर ज्या प्रकारे आणि ज्या प्रमाणात पडलेला दिसतो, त्यावरून माध्यमांना ही शक्ती प्रदान करण्यात त्या सहा तत्त्वांची भूमिका लक्षात येणे कठीण नाही. ‘शिक्षण आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील अंतर्संबंधांचा शोध म्हणावा तसा घेतला गेलेलाच नाही’, या विधानातून या विचारवंताने आपल्या शिक्षणातील ही मोठी त्रुटी दाखवून दिली आहे. आजही आपण तयार प्रश्‍नांची तयार उत्तरे, मर्यादित माहितीचे नियंत्रित वितरण आणि औद्योगिक संस्कृतीत गुणवत्ता निर्धारणासाठी बनवलेली परीक्षण साधने वापरण्यात धन्यता मानतो. जर राजकीय आणि सत्तासंबंधित प्राधान्यक्रमात माहितीचे व्यवस्थापन, वितरण आणि रूपांतर यांची चलती असेल, तर आपल्या भावी पिढ्यांना आपण आज देत असलेले शिक्षण आणि ते देण्याची पद्धत दोन्ही कालबाह्य म्हणावी लागतील. टॉफलरचे तर म्हणणे आहे की, ‘भविष्यातील माध्यम व्यवस्था आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्था यांच्यातील या नातेसंबंधांकडे आपण दुर्लक्ष केले तर या दोन्हींच्या प्रभावातून घडणाऱ्या मुलांची ती फसवणूक होईल’.

आजच्या घडीला आपली सार्वत्रिक तक्रार ‘मुलांची माध्यम-गुलामी’ ही आहे. मुलांची शोधक वृत्ती हे शिकण्याचे व्यवच्छेदक लक्षण - एवढे मान्य केले तर भोवतीचे जग न्याहाळणे, हाताळणे, समजून घेणे यातून ती स्वतःच्या ज्ञानाची रचना करतात हे नाकारता येत नाही. आपले बैठे शिक्षण ग्राहक आणि प्रेक्षक तयार करणारे ठरले आहे. नागरिक बनण्यात अभिव्यक्ती केंद्रस्थानी असते. तीन दशकांमागे आपल्यासमोर आलेले विचार आपण आचाराच्या स्तरावर आणि प्रत्यक्ष व्यवहारात स्वीकारले का, हा खरा प्रश्‍न आहे. या सहा तत्त्वांच्या वापरातून ज्ञाननिर्मितीच्या अगणित संधी प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याचे काम आपले मोठ्यांचे, हे तरी खरे ना? आपण मुलांना घरी-दारी सातत्याने देतो ते अनुभव कोणते? मुलांचे शिकणे आधी घरात होते, त्यात आपली भूमिका काय असते, आपण मुलांशी वागतो त्यामागे आपला काही विचार असतो का? हे प्रश्‍न आपण शिक्षक आणि पालक म्हणून स्वतःला विचारले पाहिजेत.

आणि त्याहीपुढे जाऊन शिक्षण व्यवस्था आणि प्रसार माध्यम व्यवस्था यांच्या संबंधांचे आपले अपुरे आकलन आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा तर घोटत नाही ना, हेही तपासले पाहिजे. शिक्षण व्यवस्थेचेच नव्हे, तर समाजाचेही आरोग्य कसे आहे याचे उत्तर तिथे मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com