डिचोली: यंदा समाधानकारक पाऊस पडूनही डिचोलीतील 'आमठाणे' धरणातील जलसाठ्याची पातळी सध्या बरीच घटली असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज बुधवारपर्यंत धरणातील पाण्याची पातळी जवळपास सात मीटर एवढी कमी झाली आहे. यावर्षी भर पावसाळ्यात गेल्या जुलै महिन्यापासून या धरणातील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्याची पाळी आल्याने धरणातील जलसाठ्यावर परिणाम झाल्याची माहिती जल संसाधन खात्याच्या सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. पाऊस जवळपास परतीच्या वाटेवर असतानाच, ऐन ऑक्टोबर महिन्यात धरणाच्या सभोवतालचे पात्र कोरडे पडले असले, तरी काळजी करण्याचे कारण नाही. लवकरच धरणातील जलसाठा नियंत्रित करण्यात येणार आहे. अशी माहिती जल संसाधन खात्याचे कार्यकारी अभियंते के. पी. नाईक यांनी दिली आहे. दरवर्षी साधारण मार्च महिन्यापासून आमठाणे धरणातील जलसाठ्याची पाणी घटत असते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे.
जलसाठा 43 मीटरपर्यंत
मेणकूरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र 582 हेक्टर मीटर एवढे आहे. तर पाण्याची पातळी 50 मीटर एवढी आहे. बुधवारी या धरणातील जलसाठ्याची पातळी 43 मीटर एवढी झाली आहे. यंदा मान्सूनला सुरवात होपर्यंत धरणातील जलसाठा समाधानकारक होता. पावसाळ्यातही हे धरण दोन-तीनवेळा तुडुंब भरले होते. मात्र यंदाच्या मोसमी पावसाने अजूनही निरोप घेतलेला नाही. त्यातच धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असले, तरी या धरणातील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येत आहे.
जल संसाधन खात्याच्या सूत्रांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, दोडामार्ग परिसरात तिळारी कालव्याला भगदाड पडल्यानंतर तिळारी कालव्यातून गोव्याला पाणी पुरवठा बंद झाला आहे. तेव्हापासून म्हणजेच गेल्या जुलै महिन्यापासून आमठाणेतील पाणी अस्नोडा प्रकल्पाला पुरवण्यात येत आहे. त्यातच अलीकडेच म्हणजेच गेल्या ता. 9 रोजी मध्यरात्री मणेरी-दोडामार्ग येथे तिळारीच्या कालव्याला पुन्हा भगदाड पडल्याने आणखी काही दिवस तरी तिळारीतून पाणी पुरवठा होणार नाही. तोपर्यंत आमठाणेतील पाणी अस्नोडा प्रकल्पात सोडावे लागणार आहे.
जलसाठा नियंत्रित ठेवणार
पावसाळा संपतानाच आमठाणे धरणाचे सभोवतालचे पात्र कोरडे पडले आहे. ही वस्तुस्थिती असली, तरी धरणातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यापर्यंत साळ बंधाऱ्यातील पाणी आमठाणे धरणात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर धरणातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यास मदत होणार आहे.
-के. पी. नाईक, कार्यकारी अभियंता, जल संसाधन खाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.