

SIR Enumeration Phase Starts In Goa: राज्यातील मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्याच्या दृष्टीने मंगळवारपासून (4 नोव्हेंबर) एसआर (Special Intensive Revision - SIR) मोहीम सुरु झाली. या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या जनगणना टप्प्याला सुरुवात झाली असून, बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन मतदारांना आवश्यक फॉर्म वितरित करुन ते भरुन घेणार आहेत.
दरम्यान, या मोहिमेसाठी राज्यातील सर्व 40 विधानसभा मतदारसंघांतील मतदारांकरिता पुनरीक्षण फॉर्म छापण्यात आले आहेत. हे फॉर्म क्षेत्रीय कामासाठी बीएलओ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
पुढील काही दिवसांत बीएलओ अधिकारी घरोघरी जाऊन हे फॉर्म वितरीत करतील. ते लोकांना फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती देतील. मतदारांनी विशेषतः 2002 च्या एसआयआर (SIR) यादीमध्ये स्वतःचे आणि त्यांच्या पालकांचे नाव तपासून, ती माहिती फॉर्ममध्ये भरण्यासाठी बीएलओला मदत करणे अपेक्षित आहे. सर्व फॉर्म भरुन आणि सह्या करुन जमा झाल्यावर, मतदार यादीचा कच्चा मसुदा प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतर दावे व आक्षेप नोंदवण्यासाठीचा कालावधी सुरु होईल.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी जनतेला या महत्त्वपूर्ण मोहिमेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "आम्ही लोकांना आवाहन करतो की त्यांनी बीएलओ अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे. जर मतदारांनी त्यांच्या पालकांचे आणि स्वतःची माहिती 2002 च्या एसआयआर मध्ये शोधून ठेवली, तर बीएलओना फॉर्म भरण्यास मदत होईल आणि प्रक्रिया जलद होईल." योग्यरित्या भरलेले आणि स्वाक्षरी केलेले जास्तीत जास्त फॉर्म परत मिळवणे, हेच या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
तसेच, या मोहिमेबद्दल अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी अंगणवाडी सेविका, महिला बचत गट तसेच विविध सरकारी विभागांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. जनतेच्या मदतीसाठी 1950 ही टोल-फ्री हेल्पलाईन (Toll-Free Helpline) आजपासून 24x7 उपलब्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, दोन्ही जिल्ह्यांमध्ये लोकांना एसआयआर मोहिमेदरम्यान मदत करण्यासाठी विशेष मदत केंद्रे देखील सुरु करण्यात आली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.