National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून व्हॉलिबॉल अन् बीच व्हॉलिबॉल बाद...

जीटीसीसीकडून शिक्कामोर्तब: आता ४३ पैकी ४२ खेळ बाकी, हँडबॉलबाबतही संभ्रम
Volleyball and Beach Volleyball Dropped from National Games
Volleyball and Beach Volleyball Dropped from National GamesDainik Gomantak

National Games 2023: गोव्यातील सध्या सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ४३ ऐवजी ४२ खेळ असतील यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. स्पर्धा तांत्रिक आचार समितीने (जीटीसीसी) व्हॉलिबॉल-बीच व्हॉलिबॉल खेळाला स्पर्धेच्या सुधारित वेळापत्रकातून वगळण्यात आले. हँडबॉलसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या खेळाबाबतही संभ्रम आहे.

Volleyball and Beach Volleyball Dropped from National Games
National Games 2023 ची मशाल गोव्याची विंड सर्फर कात्या कोएल्हो पंतप्रधान मोदींकडे करणार सुपूर्द

``व्हॉलिबॉलचा स्पर्धेत समावेश नसेल हे आम्हाला तोंडी कळविण्यात आले आहे. अधिकृतपणे लवकरच कळविले जाईल, असेही सांगण्यात आले. जीटीसीसी यांच्यातर्फे स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक बुधवारी सकाळी आम्हाला मिळाले, त्यात व्हॉलिबॉल खेळाचा समावेश करण्यात आलेला नाही,`` असे गोव्याचे स्पर्धा चेफ द मिशन संदीप हेबळे यांनी सांगितले. जीटीसीसी अध्यक्ष अमिताभ शर्मा यांच्याशी संपर्क केला असता, त्याने प्रतिसाद दिला नाही.

``स्पर्धेच्या सुधारित वेळापत्रकाच्या यादीत न्यायालयीन प्रक्रियेत असलेला हँडबॉल आणि वाद असलेल्या स्क्वे मार्शल आर्ट या खेळांचाही समावेश नाही, पण हे दोन्ही खेळांचे राष्ट्रीय स्पर्धेत आयोजन होईल, असे आम्हाला सांगण्यात आले आहे,`` असे हेबळे यांनी नमूद केले.

भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी. टी. उषा सध्या गोव्यात आहेत. व्हॉलिबॉल समावेशासंदर्भात गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी आयओएशी पत्रव्यवहार केला होता. मात्र आयओएला व्हॉलिबॉलबाबत संभाव्य खटला टाळायचा आहे. उषा यांनी व्हॉलिबॉलचा समावेश अशक्य असल्याचे आपल्याला सांगितले असून या घोषणा लवकरच अधिकृतपणे होईल, अशी माहिती क्रीडामंत्री गावडे यांनी दिली.

व्हॉलिबॉल अस्थायी समितीची असमर्थतता

देशातील व्हॉलिबॉलचा प्रशासकीय कारभार हाकण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) नियुक्त केलेल्या अस्थायी समितीने गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला व्हॉलिबॉल संघ निवडणे शक्य नसल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.

आता जीटीसीसीने हा खेळ वेळापत्रकातून वगळल्याने व्हॉलिबॉल व बीच व्हॉलिबॉल हे दोन्ही क्रीडाप्रकार ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नसतील यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला गटात प्रत्येकी आठ संघ कमी वेळ उपलब्ध असल्याने निवडता येणार नसल्याचे कारण अस्थायी समितीने दिले आहे, तसेच यासंदर्भातील कायदेशीर गुंतागुंतीकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून व्हॉलिबॉल खेळ वगळणे योग्य ठरेल, असे अस्थायी समितीला वाटते.

हँडबॉल, बीच हँडबॉलचे चित्र अस्पष्ट

हँडबॉल महासंघाबाबतही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. जीटीसीसी अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनी एका महासंघाला स्पर्धा वेळापत्रकाबाबत दिलेले पत्र यापूर्वीच मागे घेतले आहे. गोवा हँडबॉल संघटनेने स्पर्धा घेण्यासंदर्भात शंका असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केलेली आहे.

त्यावर बुधवारी न्यायालयाने हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया व हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांना प्रतिवादी करण्याचा आदेश देत सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. त्यामुळे शनिवारपासून (ता. २८) सुरू होणाऱ्या बीच हँडबॉल स्पर्धेबाबत संभ्रम आहे. हँडबॉल स्पर्धा ४ नोव्हेंबरपासून नियोजित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com