पणजी: नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी आज खात्याच्या शहर नियोजन अधिकारी तसेच मुख्य नगर नियोजकांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सोमवारच्या मंडळाच्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले आहेत, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. जे अधिकारी तीन वर्षे एकाच ठिकाणी आहेत त्यांच्या बदल्यांचे संकेतही त्यांनी दिलेत.
विश्वजित राणे यांनी खात्यांचा ताबा घेतल्यापासून अधिकाऱ्यांचा बैठका तसेच कामाचा धडाका लावला आहे व आक्रमकही झाले आहेत. नगर नियोजन मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने व विलंब न लावता करण्याच्या कानपिचक्या अधिकाऱ्यांना दिल्या.
या खात्याच्या विविध विभागामार्फत फाईल्स आजपासून येण्यास सुरुवात होईल. या फाईल्स जलदगतीने हातावेगळ्या करण्याचे आदेश नियोजन व विकास प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना देण्यात आले आहेत. 21 दिवसानंतर एकही फाईल मागे ठेवण्यात येऊ नये असे संकेत देण्यात आले आहेत. या 21 दिवसानंतर खात्याने केलेल्या कामाचा स्थिती अहवाल बैठक घेऊन घेतला जाईल व त्यावर चर्चाही होणार आहे.
या कामामध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये व जमीन असलेल्या ठिकाणी त्याची तपासणीस करण्यास अधिकाऱ्यांना सक्रिय करण्यासाठी वाहने दिली जातील. त्यामुळे अधिकाऱ्यांचे लोकांबरोबर मित्रत्वाचे नाते तयार होईल अशी माहिती मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
या खात्याच्या अधिकाऱ्यांना नवनव्या नियोजनसंदर्भात माहिती व्हावी यासाठी विकाससंदर्भातच्या नियोजनाचे प्रशिक्षणासाठी पाठवले जातील. सर्व अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे व लोकांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांमध्ये कामाबाबत मरगळ आल्याचे दिसून येत आहे. त्यात सुधारणा करण्याची गरज आहे ती लवकरच केली जाईल. नगरनियोजन खाते हे राज्यातील कार्यक्षम खाते करण्याची दृष्टी आहे असे राणे यांनी सांगितले.
दरम्यान, ज्या विभागात कथित गैरप्रकार घडले असल्यास त्याचा पर्दाफाश होऊ शकतो. मंत्री राणे यांनी सुरू केलेल्या कामाच्या धडाक्याने अधिकाऱ्यांना धडक बसली आहे. त्यांचा कामाचा वेग पाहिल्यास अधिकाऱ्यांचीही झोप उडाली आहे
अधिकारी तणावात
नगर नियोजन खात्याच्या विविध विभागांत एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मिळवून जे तीन वर्षांपासून एकाच विभागात काम करत आहेत, त्यांच्या बदल्या करण्यात येतील असे संकेत या बैठकीत राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या या संकेतामुळे अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.