राज्यातील आरोग्य क्षेत्रासाठी सरकारकडून भरभक्कम पैसा खर्च केला जात आहे, पण आवश्यक त्या ठिकाणी साधनसुविधांची वानवाच आहे. फोंड्यातील आयडी अर्थातच उपजिल्हा इस्पितळात गेला बराच काळ तज्ज्ञ शल्यचिकीत्सक नाही. या इस्पितळाच्या जेनेरिक औषध आस्थापनाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी खुद्द आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आले होते. त्यावेळी रवी नाईक यांच्या उपस्थितीतच पत्रकारांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना आयडी उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टर आणि इतर सुविधांचे काय, असे विचारल्यावर लगेच सर्व सुविधा उपलब्ध होतील, असा शब्द विश्वजीत राणे यांनी दिला होता, पण अजून त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. खरे म्हणजे आरोग्य क्षेत्रासाठी सरकार एवढा पैसा खर्च करते, मग या सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध व्हायला नकोत का...! ∙∙∙
शिवोली मतदारसंघातील विशेषतः हणजूण-कायसूव या भागांतील पाण्याचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासून ‘जैसे थे’ आहे. या परिसरातील लोक अधूनमधून साबांखा पाणीपुरवठ्याच्या कार्यालयावर धडक देतात. यावेळी अभियंत्यांकडून तोंडी आश्वासन दिले जाते, परंतु अद्याप यावर कायमचा असा तोडगा संबंधितांना काढता आलेला नाही. मंगळवारी पुन्हा या भागांतील लोकांनी अभियंत्यांना जाब विचारला. सध्या जलवाहिन्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. यावेळी काही आंदोलक आडोशाला आपापसात चर्चा करताना दिसले की, गेली शिवोली विधानसभा निवडणूक ही पाण्याच्या विषयावर झाली होती. परंतु अद्याप हा विषय काही सुटलेला नाही. लोकप्रतिनिधी पाठपुराव्याला कमी पडले की अभियंत्यांकडून अपेक्षित काम होत नसल्याने हा प्रश्न खितपत पडला म्हणायचा? कारण ही समस्या आता न सुटल्यास पुढच्या वेळी लोकप्रतिनिधींच्या घरी घागर मोर्चा न्यावा लागेल, अशीही चर्चा मोर्चेकऱ्यांत सुरू होती. ∙∙∙
गोवा सध्या देशातील कॅसिनोंची राजधानी म्हणून प्रसिद्ध असून येथे कॅसिनो संस्कृती रूजली आहे. आता पणजीतील कॅसिनो कमी पडत होते, की ऑनलाईन कॅसिनोंची जाहिरात होताना दिसते. अशाच एका चाणाक्ष व्यक्तीने गोवा वीज खात्याच्या संकेतस्थळावर ऑनलाईन कॅसिनोंची जाहिरात दाखवत असल्याचा व्हिडियो व्हायरल केला. त्यामुळे कॅसिनो हे केवळ तरंगते जहाज किंवा तारांकित हॉटेलपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर जाहिरातींमार्फत घरोघरी पोहोचले आहेत. ही जाहिरात सरकारी खात्याच्या संकेतस्थळावर कशी आली, याचे काही तरी कारण देऊन वीज खाते पळवाट काढणार, यात काही शंका नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या जात आहेत. ∙∙∙
आमदार, मंत्री यांच्या दिल्ली वाऱ्या चालूच असतात. मात्र त्यांच्या बद्दलच्या दौऱ्यांची वाच्यता होत नसते. दिगंबर कामत गोव्याबाहेर गेले की, लगेच काही तरी घडामोडी होईल असा अंदाज बांधता जातो. हे आताच नव्हे तर ते कॉंग्रेस मध्ये होते तेव्हा पासून सुरू आहे. तेव्हा ते भाजपात जाणार अशी कुणकुण होती. शेवटी ते भाजपात गेले. आता तरी त्यांच्या वाऱ्यां बद्दल कांहीही बोलणे होणार नाही असे वाटत होते. पण नाही. आता मंत्रीमंडळात बदलाकडे त्यांचा संबंध जोडला जातो. आज दुपारीच दिगंबर बाब दिल्लीत गेल्याची वार्ता मडगावात पसरली. सकाळचा रवींद्र भवन मधील कार्यक्रम अर्धवट सोडून ते विमानतळावर गेले. ‘बाबा दिल्ली गेला. मंत्री जाता दिसता’, अशी दबक्या आवाजात चर्चा लोकांत नव्हे तर त्यांच्याच कार्यकर्त्यांत सुरू झाली. मुस्लिम बांधवांच्या जुलूसमध्ये त्यांच्याऐवजी पुत्र योगिराज दिसले. संध्याकाळी पिंपळकट्ट्यावरील ते प्रमुख पाहुणे होते, तिथेही ते दिसले नाहीत. म्हणजे नक्कीच ते नवी दिल्लीत गेल्याची चर्चा सुरू होती. उद्या येताना चांगली बातमी आणू दे रे बाप्पा, असे पिंपळकट्ट्यावर त्यांचे कार्यकर्ते गणपती बाप्पाला साकडे घालताना दिसत होते. ∙∙∙
गोव्यात अवघ्या साडेआठ महिन्यांत रस्ते अपघातात २०० लोकांचे बळी गेल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका केली जातेय. या मृत्यूंना वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो हे तसेच जखमींवर त्वरित उपचार करण्यास आरोग्य खाते असमर्थ ठरल्याने आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हेच जबाबदार असल्याचा आरोप यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला हाेता. या सर्व पार्श्वभूमीवर काल माविन गुदिन्हो यांनी ही सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर ढकलून अपघातांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंतेच जबाबदार असल्याचा आराेप केला आहे. माविन यांच्या या वक्तव्याचा सारांश काढल्यास ते एका अर्थी सार्वजनिक बांधकाम खातेच अकार्यक्षम आहे, असे म्हणतात. माविन यांचा हा तीर या खात्यातील अभियंत्यांवर की मंत्र्यांवर? हे मात्र कळू शकले नाही. ∙∙∙
मडगाव नगरपालिकेने २०१५ मध्ये पायाभरणी केलेल्या बहुमजली पार्किंग प्रकल्पाच्या मुहुर्ताला कुजका नारळ तर ठेवला नव्हता ना, अशी विचारणा आता मडगावकर करताना दिसत आहेत. कारण या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कोणीच पुढे येत नाहीत. त्या वेळी कोणतेच सोपस्कार न करता पायाभरणी केली गेली ती कोणा राजकारण्याच्या सांगण्यावरून असे प्रश्नही आता केले जाऊ लागले आहेत. त्या पायाभरणीनंतर प्रथम निविदा मागविली अन् जीएसटी कोणी चुकती करायची, असा वांधा निर्माण झाला. त्यात काही वर्षे गेली नंतर निविदा मागविली असता एकच निविदा आली ती स्वीकारणे नियमात बसत नव्हते व पुन्हा वेळ वाया गेला. नंतर हा प्रकल्प ‘जी सुडा’कडे हस्तांतरीत केला गेला व त्याने ई निविदा मागविल्या असता पंधरा कोटी खर्चाच्या कामाला पुन्हा एकच निविदा आली. त्यावर तोडगा म्हणून दोनदा निविदा मुदत वाढविली पण त्याचा फायदा झाला नाही, त्यामुळे अन्य कोणत्याही बांधकामासाठी उड्या टाकणारे ठेकेदार या प्रकल्पाबाबत उदासीन का, असे कोडे सर्वांनाच पडले आहे. त्यामुळे मडगावची पार्किंग समस्या लवकर दूर होणार नाही, हे मात्र स्पष्ट झाले आहे. ∙∙∙
कुटबण येथे पसरलेल्या कॅालरा साथीत अनेक बळी गेल्यामुळे सरकारी यंत्रणा तसेच ट्रॅालर व नौकावाल्यांची सध्या तारांबळ उडालेली दिसते. पण मुद्दा तोही नाही, तर २०१८ -१९ दरम्यान तेथे जो २२२ मीटर लांबीचा नवा धक्का अनेक कोटी खर्चून बांधला गेला तो अजून वापरांत का आणला नाही, त्याचे उद्घाटन का केले नाही, याचे कोडे अनेकांना सुटलेले नाही. नव्या घटनेनंतर आता तो सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असल्या तरी त्यांतील खरी गोम पुढेच आहे. असे सांगतात की, त्याचे बांधकाम तकलादू झाले आहे. त्यावर सहा चाकी वाहने जाऊ शकत नाहीत व त्यामुळेच तो वापरांत आणला नाही. तसे असेल तर कोटयवधी रुपये खर्चून त्याचे बांधकाम तरी का केले गेले, असे मुद्दे आता उपस्थित झाले आहेत. ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने म्हणे हा सारा प्रकार घडलेला असून त्यामुळे कुटबणवर नौकांची संख्या मोठी असूनही धक्का वापरांत आणला गेलेला नाही.कॅालरा साथ अनेक दिवस झाकून ठेवण्यामागील कारणही म्हणे हेच होते. संचालकांना त्यामुळेच तर हटविले गेले नाही ना? ∙∙∙
सध्या सरकारने केवळ कुटबण जेटीवरच आपले लक्ष केंद्रित केले आहे. मोबोर जेटीवर सुद्धा कॉलराचे रुग्ण सापडले होते व एक -दोन मजुरांचे निधनही झाले होते. जेटीवरील उपाययोजनांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यावर घातली आहे. मात्र मंत्रिमहोदय केवळ कुटबण जेटीवरच लक्ष केंद्रित करून आहेत. या संदर्भात विचारले असता ते सांगतात की, मोबोर जेटीची जबाबदारी बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगसने आपण घेतली आहे व तसे त्यांनी केळशी येथील ग्रामसभेत लोकांना सांगितले आहे. मोबोर जेटीवरील सर्व समस्या सोडविण्यास आपण समर्थ असल्याचे कॅप्टन वेन्झीने सांगितले होते. या कामी त्याला आपण शुभेच्छा व्यक्त करतो,असेही पर्यावरण मंत्री सिक्वेरा सांगतात. राजकारण कुठे व कसे करावे हे केवळ राजकारण्यांनाच चांगले ठाऊक असते. मोबोर जेटीवरील परिस्थिती पाहता सरकारचीही तेवढीच जबाबदारी आहे. त्याच बरोबर आमदार कॅप्टन वेन्झींनीही थोडा कमीपणा घेऊन सरकारकडे सहकार्य मागायला काहीच हरकत नव्हती. राजकारण करा, मात्र मच्छिमार मजुरांचे जीव वाचवा, असे लोक बोलू लागले आहेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.