दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे फोंड्यात आले आणि आरोग्य सुविधांवर ते भरभरून बोलले. आधी आरोग्य सेवा सुधारा असे सांगताना त्यांनी फोंड्यात उभारण्यात आलेल्या भव्य इस्पितळ प्रकल्पाचे कौतुक केले. फोंडा तसेच लगतच्या भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एवढा मोठा हा खूप छान प्रकल्प उभारला त्यासाठी चांगले नियोजन केले असल्याचे ते म्हणाले. हा इस्पितळ प्रकल्प फोंड्याचे आमदार तसेच विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांनी उभारला आहे. रवी नाईक हे गृहमंत्री होते, त्यावेळेला या इस्पितळाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर पायाभरणी झाली आणि नंतरच्या काळात या इस्पितळाचे लोकार्पण करण्यात आले. फोंडा तसेच लगतच्या भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात हाच उद्देश रवींनी बाळगला होता आणि त्यादृष्टीने हे भव्य इस्पितळ उभारले. मात्र, या इस्पितळात आता आरोग्य खात्याकडून चांगल्या सुविधाच नाहीत, विशेष म्हणजे सीटी स्कॅन यंत्रणा नाही, त्यामुळे प्रत्येकवेळी रुग्णांना बांबोळीला जावे लागते. विरियातो यांनी भव्य स्वरूपात उभारण्यात आलेल्या इस्पितळ प्रकल्पाचे कौतुक केले आणि अर्थातच या इस्पितळाचे जनक असलेल्या रवी पात्रावांची प्रशंसा केली. ∙∙∙
राज्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांवर कारवाई करणार असल्याची जाहीर गेले, परंतु या विधानावरून विरोधकांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला. रस्ते सध्या भ्रष्टाचाराचा स्रोत झाल्याचा आरोप खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला आहे. तसेच कंत्राटदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेणाऱ्यांवर अगोदर कारवाई करावी, असे मत त्यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केल्यानंतर त्यांना समर्थन मिळाले. सरकारी यंत्रणा पूर्णता ठप्प झाल्याने हॉटमिक्स केलेले रस्ते वाहून जाण्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत. काही ठिकाणी रस्ते गायब झाले आहेत. या प्रकारामुळे एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्याऐवजी सरकारने चांगल्या आणि टिकाऊ रस्त्यांची खात्री दिली पाहिजे अशा प्रतिक्रिया लोकांकडून येत असल्याने येणारा काळ सरकारसाठी कसोटीचा ठरणार अशी चर्चा ऐकू येत आहे. ∙∙∙
व्हेंझी व्हिएगस यांचे कुटुंब आम आदमी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांसाठी ‘लकी’ आहे का? असा प्रश्न व्हेंझीच्याच समाज माध्यमांवरील एका पोस्टमुळे लोकांना पडला आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल जामीन मिळाला. योगायोगाने काल व्हेंझी व्हिएगस यांच्या मुलीचा वाढदिवस होता. यापूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही अबकारी घोटाळा प्रकरणात अटक झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी जामीन मिळाला होता आणि योगायोगाने त्या दिवशी व्हेंझींचा वाढदिवस होता. व्हिएगस कुटुंबीयांचे वाढदिवस आणि दिल्लीतील आप नेत्यांना मिळणारे जामीन याच्यामागे काही योगायोग आहे का? ∙∙∙
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर काँग्रेसने आज उपरोधिक टोले लगावले आहेत. लोकसभा निवडणुकीत ‘मौनी बाबा’ म्हणून काँग्रेसने त्यांचा प्रचार केला होता. तरीही श्रीपाद नाईक हे निवडून आले, पण राज्यातील आणि विशेषतः उत्तर गोव्यातील जे ज्वलंत विषय उपस्थित झाले, त्यात भूरूपांतरण, टॅक्सीचालकांचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन महामंडळाचा बांधकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प, रेईस मागूस येथील डोंगरकापणी अशा विषयांवर श्रीपाद नाईक काहीच बोलले नाहीत. परंतु त्यांनी खरेदी केलेल्या जमीन खरेदी व्यवहारावर राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांनी बोट ठेवल्याने नाईक यांना तोंड उघडावे लागले, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. नाईक यांची प्रतिक्रिया आल्यानंतर काँग्रेसने नाईक यांचे अभिनंदन केले असले तरी नेमकेपणे नाईक यांच्या भूमिकेवर कवठणकर यांनी उंगलीनिर्देश केले आहेत. निवडणुकीवेळी काँग्रेसकडून टीका होताच नाईक यांनी पलटवार केला होता. कवठणकरांनी केलेल्या आरोपावर ते कोणता पलटवार करतात याकडे काँग्रेसवाल्यांचे लक्ष लागलेले असणार हे स्पष्ट आहे. ∙∙∙
राज्यात जर रस्त्यावर गुरे आढळली, तर ती संबंधित अधिकाऱ्यांद्वारे ताब्यात घेतली जातील व अशा भटक्या गुरांच्या मालकांना सरकारी अनुदान देण्यात येणार नाही अशी अधिसूचना पशुसंवर्धन खात्याने काढली आहे. परंतु ही गुरे ताब्यात कोण घेणार? कोणाला अधिकार आहेत? जर एखाद्या व्यक्तीला याबाबत माहिती द्यायची असेल, तर कोणाला द्यावी याचा कोणताच उल्लेख नसल्याने संभ्रमावस्था आहे. सरकारच्या निर्णयाचे स्वागत होतेय, परंतु ठोस भूमिका दिसून येत नसल्याने नक्की खाते ठोस भूमिका घेणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ∙∙∙
म्हापसा उपनिबंधक कार्यालयातून जमीन खरेदी विक्रीच्या तीन प्रकरणातील तीन फाईल गहाळ झाल्याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंद झाली आहे. या प्रकरणी आतील व्यक्तीचाच हात असावा असे गृहीत धरून सीसी टीव्ही फुटेजची मागणी पोलिसांनी केली आहे. मुळात ऑनलाइनच्या जमान्यात अशा फाईल्स कशा काय नाचवल्या जातात. सरकार तर ई-प्रशासन गतिमान आहे असे म्हणते, तर मग या फाईल आल्या कुठून. फाईल गहाळ झाल्या तरी त्या व्यवहाराची नोंद उपनिबंधक कार्यालयाच्या संगणकीय प्रणालीवर असेलच. त्यावरून एक काय कितीही फाईल तयार करता येतील. एकतर अद्यापही सरकार फाईलच्या जमान्यातच अडकले आहे किंवा ई-प्रशासन हे केवळ नावालाच आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.∙∙∙
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे शुक्रवारी दिल्लीत होते. राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा शीतपेटीत जाण्याच्या मार्गावर असताना राणे यांचा दिल्ली दौरा राजकीय तरंग उठवणारा ठरला आहे. भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्याशी त्यांची भेट झाल्याने राज्यातील भविष्यातील राजकीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. या बैठकीची राणे यांनी समाज माध्यमांवर माहिती न दिल्याने त्याविषयी वेगळीच चर्चा सुरू आहे. राणे यांच्यावर भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत कोकणातील मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. त्या अनुषंगाने संतोष यांची भेट राणे यांनी घेतल्याचे सांगण्यात येते. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेचा फटका सत्ताधारी भाजप आघाडीला बसू नये यासाठी काळजी घेण्यासाठी राणे यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गातील राजकारण अलीकडच्या वर्षात जटिल बनले आहे. कोण कोणाचे राजकीय मित्र व कोण कोणाचे राजकीय शत्रू हे समजेनासे झाले आहे. लोकसभेत एक भूमिका घेणारे विधानसभेसाठी दुसरीच भूमिका घेतात. राणे यांना दिल्लीत विशेष काही सूचना मिळाल्या असतील असे बोलले जात आहे. गोव्यातील राजकारणाबाबत संतोष यांच्याकडे पूर्णपणे माहिती असते. त्यांच्या संमतीनेच संघटनात्मक व सरकारी पातळीवर बदल होऊ शकतात. यामुळे राणे यांनी त्यांना राज्यातील राजकारणाबाबत काय महत्त्वाची माहिती पुरवली याचीच उत्सुकता सर्वांना अगदी विरोधकांनाही आहे. ∙∙∙
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ कारकून भरतीत घोटाळा झाल्याच्या आरोपामुळे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची दोन प्रकारे अडचण तर झाली आहेच, पण एकप्रकारे त्यांची कोंडीही झाली आहे. त्यांच्याकडे महसूल खाते असून त्यांनी घोटाळ्याचा इन्कार तर केला आहेच, त्याचबरोबर घोटाळ्याचा पुरावा सादर करण्याचे आव्हान दिल्याने या प्रकरणाची रंगत वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. सरकारने अजून हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. पण मुद्दा तो नाही, कारण वर्ष दीड वर्षापूर्वी स्वत: मोन्सेरात यांनी साबांखात अभियंता भरतीत असाच घोटाळा झाल्याचा आरोप केला होता व त्यामुळे तत्कालीन साबांखामंत्री नीलेश काब्राल केवळ अडचणीत आले नाहीत, तर त्यातूनच नंतर त्यांना मंत्रिपद गमवावे लागल्याचे सांगितले जात होते. खरे काय ते भाजपवाल्यांनाच माहीत, पण दैव योग म्हणजे बाबूशनी पूर्वी जो आरोप काब्राल यांच्यावर केला होता तसाच आरोप आज बाबूश मोन्सेरात यांच्यावर झालेला आहे. त्यामुळे आता बाबूश काय करणार अशी विचारणा काब्राल समर्थक करत आहेत म्हणे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.