

पणजी: गोव्यातील जमिनींचे रक्षणासाठी आपण येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे विधेयक मांडले आहे, ते मंजूर होऊन सरकारने त्याचे कायद्यात रुपांतरण करावे, यासाठी जनतेने आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे (आरजीपी) आमदार वीरेश बोरकर यांनी केले.
पणजीतील पक्ष कार्यालयात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरनियोजन (टीसीपी) कायद्याअंतर्गत विविध कलमे आणून भाजप सरकारने राज्यातील जमिनींचे विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रुपांतरण सुरू केलेले आहे. यातील अनेक जमिनी परप्रांतीयांच्या घशात जात आहेत.
राज्यातील जमिनी भावी पिढीसाठी राखून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गोमंतकीयाची आहे. त्यामुळेच आपण ‘टीसीपी’च्या कलम ३९ ‘अ’ विरोधात आंदोलन पेटवले. हे कलम रद्द करण्याची मागणी करीत जमीन संरक्षणासाठीचे खासगी विधेयक आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेले आहे. या विधेयकाला मंजुरी मिळून त्याचे कायद्यात रुपांतरण व्हावे, यासाठी गोमंतकीय जनतेने आपल्याला पूर्ण पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे आमदार बोरकर म्हणाले.
‘टीसीपी’च्या कलम ३९ ‘अ’ विरोधात आपण सुरू केलेल्या आंदोलनाचा भाजपने धसका घेतलेला आहे. त्यामुळेच लोकांना नको असेल तर सरकार त्या भागांत प्रकल्प आणणार नसल्याची हमी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक देत आहेत. त्याच दामूंनी हिंमत असेल तर जमिनींचे रुपांतरण करण्यापासून टीसीपी मंत्र्यांना रोखून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
‘प्रीस्कॉन’ला सुरुवातीपासूनच विरोध
आगशी–मंडूर येथे आलेल्या प्रीस्कॉन प्रकल्पाला आपण आमदार होण्याआधीपासूनच विरोध दर्शवला होता. त्याविरोधात आंदोलनेही छेडली होती. आमदार झाल्यानंतरही आपण या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता.
आरजीपीने पाठिंबा दिलेल्या आगशी पंचायतीने या प्रकल्पासाठी ऑक्युपन्सी प्रमाणपत्र दिल्यानंतर आरजीपीने पंचायतीला दिलेला पाठिंबाही मागे घेतला. आपल्या ३९ ‘अ’विरोधातील आंदोलनाला गोमंतकीय जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळेच भाजपची सोशल मीडिया टीम प्रीस्कॉन प्रकल्पावरून आपल्याविरोधात अपप्रचार करीत असल्याचा दावाही आमदार वीरेश बोरकर यांनी केला.
गावांमध्ये मेगा प्रकल्प नकोच!
भाजप सरकार गावागावांमध्ये मेगा प्रकल्प आणून गावांचा विनाश करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे गावांमध्ये असे मेगा प्रकल्प नको, यासाठी पंचायतराज कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी करणारे खासगी विधेयकही आपण अधिवेशनात सादर केलेले आहे, असेही आमदार वीरेश बोरकर यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.