
पणजी: राज्यातील समस्यांचा पाढा वाचून पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवत आहेत, अशा आशयाची पोस्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दिवाळीच्या सुट्टया आणि नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये पर्यटक गोव्याऐवजी व्हिएतनाम आणि थायलंडला पसंती देत असल्याचा दावा केला जात आहे. महागडे हॉटेल, वाहतुकीची समस्या यावर नेटकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सुरज कुमार तलरेजा नाव्याच्या व्यक्तीने सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. "नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात गोव्यातील किंमती तपासल्या तर तुम्हाला धक्का बसेल. बडे रिसॉर्ट जसे ताजमध्ये एका रात्रीसाठी साठ हजार रुपये आणि मॅरिऑटमध्ये २५,००० रुपये आकारले जात आहेत. एवढेच नव्हे तर ३ आणि ४ तारांकीत हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी १० हजार रुपये आकारले जात आहेत", असा दावा सुरज कुमार यांनी केला आहे.
"राज्यात ओला – उबेर सारखी कॅब सुविधा नसल्याने तुम्हाला टॅक्सीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील", असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
'व्हिएतनाम, थायलंड आणि मलेशिया यासारख्या देशांसोबत तुलना केल्यास हा दर खूपच अधिक असल्याचे दिसते', असे सुरज यांनी म्हटले आहे. 'या देशांत उत्तम रिसॉर्ट, स्वच्छ समुद्रकिनारे आणि उत्तम पायाभूत सुविधा अगद्या माफक किंवा गोव्याच्या तुलनेत निम्म्या दरात उपलब्ध आहेत', असा सुरज यांनी या पोस्टमध्ये दावा केला आहे.
'त्यामुळे मोठ्या संख्येने भारतीय परदेशात पर्यटनासाठी जात आहेत, यात आश्चर्यकारक काहीच नाही', असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुरज यांच्या या पोस्टवर अनेकांनी मतं व्यक्त केली आहेत. “ताजमध्ये ६० हजार ही चांगली ऑफर आहे. मी यासाठी एकदा ८० हजार रुपये मोजले होते. आणि त्यावेळी नोव्हेंबर किंवा डिसेंबर देखील नव्हता. पैशांच्या तुलनेत गोव्यात वास्तव्य, वाहतूक या सुविधा व्यस्थित नाहीत”, असे मत मनीषा सिंघल यांनी व्यक्त केले आहे.
“व्हिएतनाम किंवा थायलंडला जाऊन आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गोवा एक स्कॅम आहे. गोव्यात खर्च होणाऱ्या पैशांच्या तुलनेत दक्षिण पूर्व आशियायी देशात कमी खर्चात उत्तम सुविधा मिळतात”, असा दावा आणखी एका युझरने केला आहे.
"महागड्या सुविधा एकीकडे आणि लोकांचा उद्धट स्वभाव एकीकडे तसेच, टॅक्सी चालकांची एकाधिकारशाही गोवा पर्यटकांसाठी त्रासदायक ठरतो. माफियांकडून होणारा त्रास तुमच्या सुट्टीच्या आनंदावर पाणी फिरवू शकतो. पर्यटकांना चांगली वागणूक मिळणे अपेक्षित आहे", असे मत दुसऱ्या एकाने मांडले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.