Waste Processing Plant: गाव उद्‌ध्‍वस्‍त करणारा प्रकल्प नकोच! ग्रामस्थांनी आवळली मूठ

Kudchire Waste Management Project: ५०० पेक्षा अधिक ग्रामस्‍थांनी सभेला उपस्‍थिती लावून शक्तिप्रदर्शन घडविले
Kudchire Waste Management Project: ५०० पेक्षा अधिक ग्रामस्‍थांनी सभेला उपस्‍थिती लावून शक्तिप्रदर्शन घडविले
Kudchire Waste Processing PlantDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: कुडचिरेतील नियोजित प्रकल्‍प काय आहे, त्‍याचा उद्देश काय, हे ग्रामस्‍थांना पटवून देण्‍यात लोकप्रतिनिधी, सरकारी कमी पडले. त्‍यामुळे या प्रकल्‍पाला ग्रामस्‍थ तीव्र विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) झालेल्‍या खास ग्रामसभेत कचरा प्रकल्पच नव्हे तर ‘कन्स्ट्रक्शन आणि डॅब्रीज’ प्रकल्पाच्या नावाखाली गाव उद्‌ध्‍वस्‍त करणारा कोणताही प्रकल्प कुडचिरे गावावर लादू नये, अशी एकमुखी मागणी करून तसा ठरावही मंजूर करण्‍यात आला. ५०० पेक्षा अधिक ग्रामस्‍थांनी सभेला उपस्‍थिती लावून शक्तिप्रदर्शन घडविले.

कुडचिरे येथील श्री बाराजण देवस्थान परिसरात वेस्ट मॅनेजमेंट महामंडळातर्फे प्रकल्प उभारण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्‍यासाठी ४४ हजार चौरस मीटर जमीन संपादित करण्यात आली आहे. गेल्या गुरुवारी पोलिस बंदोबस्तात भू-सर्वेक्षणही करण्यात आले. त्यावेळी संतप्त बनलेल्या कुडचिरेतील लोकांनी रस्त्यावर उतरून भू-सर्वेक्षणाला तीव्र विरोध केला होता. पण पोलिस बंदोबस्‍तात ते काम पूर्ण करण्‍यात आले होते.

या पार्श्वभूमीवर आज बोलाविलेल्‍या खास ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कुडचिरे गाव उद्‌ध्‍वस्‍त करणारा कोणताही प्रकल्प नकोच, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्‍यात आला. आत्माराम उमर्ये यांनी हा ठराव वाचला. त्यावेळी श्री सातेरी देवी आणि श्री बाराजण देवाचा जयघोष करत उपस्थित लोकांनी हात उंचावून ठरावाला समर्थन दिले. वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुडचिरेच्या लोकांनी ग्रामसभेत दिला.

सरपंच प्रियंवदा गावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेला उपसरपंच तुळशीदास चिबडे, अंजली गावकर, दिया गावकर, निखिल, सागर आणि शाहू वरक हे पंचसदस्य उपस्थित होते.

५०० हून अधिक ग्रामस्‍थांची उपस्‍थिती

प्रकल्पावरून गेल्या गुरुवारी गावात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाल्यानंतर संतप्त लोकांनी प्रकल्पाच्या मुद्यावरून खास ग्रामसभा घेण्याची मागणी पंचायतीकडे केली होती. त्यानुसार आज कुडचिरे येथील श्री सातेरी देवस्थानात ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. या ग्रामसभेत स्थानिक लोकांनी शक्तिप्रदर्शन घडविले. ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि युवावर्ग मिळून ५०० हून अधिक लोक उपस्थित होते.

पंचायत म्‍हणते, आम्‍हाला अंधारात ठेवले!

ग्रामस्‍थांनी पंचायत मंडळावर प्रश्‍‍नांचा भडिमार केला. त्‍यावर, आम्हाला अंधारात ठेवून भू-सर्वेक्षण केल्याचे पंचायतीने स्पष्ट केले. सदर प्रकल्प झाल्यास गावातील नैसर्गिक जलस्रोत संकटात येतील व याची कल्पना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पंचायतीने दिली असल्‍याचे सरपंच प्रियंवदा गावकर यांनी सांगितले. मात्र त्यावर ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. त्‍यांनी प्रश्‍‍नांची सरबत्ती सरूच ठेवली.

Kudchire Waste Management Project: ५०० पेक्षा अधिक ग्रामस्‍थांनी सभेला उपस्‍थिती लावून शक्तिप्रदर्शन घडविले
Illegal Stone Mining: बेकायदा चिरेखाणीसाठी नियोजित प्रकल्पाला विरोध! कुडचिरेवासीयांची दिशाभूल; महामंडळाच्या जागेचा गैरवापर

अन्‌ ज्‍येष्‍ठ महिलाही सरसावली

ग्रामसभा सुरू असताना गावातील एक ज्येष्ठ महिला व्यासपीठावर आली. तिने प्रकल्पाविरोधात गावाच्या बाजूने राहणार असल्याचे आश्‍‍वासन पंचायत मंडळाकडून घेतले. त्‍यामुळे ग्रामस्‍थांचाही हुरूप वाढला. गावच्या अस्तित्वासाठी प्रस्तावित प्रकल्पाविरोधात संघटितपणे लढा देण्याचा निर्धार त्‍यांनी यावेळी व्‍यक्त केला.

गावाला प्रकल्प नको असल्यास आम्‍हालाही तो नकोच. ग्रामपंचायत सदर प्रकल्‍पाला ‘ना हरकत’ दाखला देणार नाही. पंचायत मंडळ गावच्या बाजूने आहे.

प्रियंवदा गावकर (सरपंच, कुडचिरे)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com