कुडचिरे येथे गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या जागेत बेकायदा चिरेखाण सुरू आहे. महामंडळाने अनेकदा याविषयी तक्रारी केल्या आहेत. अलीकडे ३ एप्रिल रोजी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे केलेल्या पाहणीत बेकायदा चिरेखाणीत चिरे नेण्यासाठी आलेला ट्रक आढळून आला होता.
महामंडळाने ८ एप्रिल रोजी खाण खात्याला याविषयी पत्र लिहून माहिती कळविली होती. त्यामुळे कुडचिरेतील प्रकल्पाला होत असल्याच्या विरोधामागे बेकायदा चिरेखाणीचा विषय तर नसावा, असा संशय घेण्यास जागा निर्माण झाली आहे. ‘अत्यंत तातडीचे’ असा शेरा मारून महामंडळाचे सरव्यवस्थापक नंदन प्रभुदेसाई यांनी खाण संचालकांना हे पत्र पाठवले होते. त्या पत्रातून या बेकायदा चिरेखाणीवर कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली होती. कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी हा महामंडळाचा प्रकल्प नव्हे असे काल म्हटले असले, तरी तो प्रकल्प महामंडळाचाच आहे.
यापूर्वीही झाला होता विरोध
कुडचिरे येथे ४४,४७८ चौरस मीटर क्षेत्रातील ही जमीन सर्वे क्र. १४६/२, १४६/३, १४६/४, १४६/६, १४८/२, १४८/६, १४८/७ मध्ये आहे. सरकारने १८ मे २०२० रोजी या जमिनीचा ताबा महामंडळाकडे दिला. त्यानंतर या जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक पातळीवर विरोध होत आहे. यापूर्वीही पोलिस संरक्षणात या जमिनीच्या सीमांची निश्चिती करण्यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे.
या प्रकल्पासाठी नॉर्वे सरकारच्या ‘सिंटेफ’ या यंत्रणेशी महामंडळाने करार केला आहे. त्यानुसार वित्तीय व तांत्रिक मदत सिंटेफ देत आहे. बांधकाम साहित्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान कुडचिरेतील प्रकल्पात नॉर्वे पुरविणार आहे. टाकावू बांधकाम साहित्यात कॉंक्रिटचे तुकडे, सिरॅमिकचे तुकडे, पेव्हर्स, जिप्सम प्लास्टर आणि चिऱ्यांच्या तुकड्यांचा समावेश असतो. त्यावर प्रक्रिया करून ते साहित्य पुन्हा वापरात आणण्याजोगे बनविण्याचे तंत्रज्ञान नॉर्वेने विकसित केले आहे.
टाकावू बांधकाम साहित्यातून वीट तयार करण्याचे पेटंट गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने मिळविले आहे. हे पेटंट वापरण्यास देऊन विटांचे वाणिज्यिक पद्धतीने उत्पादन करण्याचा महामंडळाचा विचार आहे. त्यासाठी कुडचिरे येथील प्रकल्प महत्त्वाचा आहे.
टाकावू साहित्यापासून वीट तयार करण्यापूर्वी महामंडळाने रस्त्यालगत टाकण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्याचे नमुने गोळा केले होते. त्यातून टिकावू बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या विटेची निर्मिती केली होती. या प्रकल्पातून स्वामीत्व धनाच्या (रॉयल्टी) रूपाने सरकारला महसूल मिळविण्याची योजना आहे.
महामंडळाने केलेल्या पाहणीनुसार, दरदिवशी राज्यभरात ५२५ टन बांधकाम टाकावू साहित्य रस्त्यालगत फेकले जाते. त्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने त्याचा थेट परिणाम जलस्रोत प्रदूषित होण्यावर होतो. कुडचिरेत या टाकावू साहित्यापासून टिकावू बांधकाम साहित्याची निर्मिती केली जाईल. या प्रकल्पातून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी पसरणार नाही, असे महामंडळाने प्रकल्प अहवालात म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.