Goa Farming: खाण व्यवसायामुळे उद्ध्वस्त झालेली आमची शेती सुपीक करून पूर्ववत आम्हांला द्या. या मागणीसाठी संघटित झालेल्या पिळगावमधील शेतकऱ्यांनी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
आक्रमक बनलेल्या या शेतकऱ्यांनी आज (सोमवारी) लाकडी काटेरी कुंपण घालून खाणीकडील रस्ता अडवला. इतकेच नव्हे, तर या शेतकऱ्यांनी रस्त्यावर चक्क झोपडीही उभारली.
आमची शेतजमीन सुपीक करून आमच्या ताब्यात मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत, असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे. वेदांता खाण कंपनीने घरी बसवलेल्या स्थानिकांना कामावर घेत नसाल, तर खाणीच्या विळख्यात अडकलेल्या आमच्या शेती सुपीक करून पूर्ववत आम्हांला द्या, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.
पुन्हा शेती व्यवसाय केल्यास संसार चालविण्यास हातभार लागेल, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सुधाकर वायंगणकर, लक्ष्मण कवळेकर, राघोबा पेडणेकर, अनिल सालेलकर यांच्या नेतृत्वाखाली पिळगावमधील शेतकरी आज सकाळी रस्त्यावर उतरले. या शेतकऱ्यांनी सारमानस येथे खनिज वाहतुकीसाठी तयार केलेला खाणीवरील अंतर्गत रस्ता अडवला. शेतकऱ्यांनी स्वतः रस्त्यावर काटेरी कुंपण घालून झोपडी उभी केली.
आम्हाला शेती हवी
खाण व्यवसायामुळे शेती व्यवसायावर संक्रांत आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शेती व्यवसाय बंद झाला आहे. 30 हजाराहून अधिक चौरस मीटर शेती उद्ध्वस्त झाली आहे, अशी माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आता आम्हांला शेती करण्यावाचून पर्याय नाही, असे या शेतकऱ्यांनी सांगून, आमची शेती आम्हांला मिळालीच पाहिजे. अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.