Goa Politics: तवडकर-गावडे वादावर पडदा

Goa Politics: विधानसभेत सभापतींनीच चर्चेला दिला नकार
Govind Gaude & Ramesh Tawadakar
Govind Gaude & Ramesh Tawadakar Dainik Gomantak

Goa Politics: विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी जाहीरपणे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याकडून विशेष अनुदानाचा दुरुपयोग झाल्याचा आरोप केल्याच्या तीन दिवसात भाजपने आपल्या पोलादी शिस्तीच्या पडद्याआड हे प्रकरण मिटवून टाकले. यामुळे या विषयावरून

स्थगन प्रस्ताव आणून विधानसभेत चर्चा करण्याची विरोधी आमदारांची इच्छा अपूर्णच राहिली. हा विषय पूर्वी जनतेसमोर आणणाऱ्या सभापतींनीच या विषयावरील चर्चेला विधानसभेचे कामकाज सुरू होतानाच नाकारले आणि सर्वानाच धक्का बसला.

तवडकर व गावडे आपापल्या म्हणण्यावर ठाम राहिले, तर विरोधक त्याचा राजकीय फायदा विधानसभेत घेतील, याची पुरती कल्पना भाजपच्या स्थानिक नेत्‍यांना आली होती. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी या विषयावरून स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्यावर विरोधकांचे मनसुबे सत्ताधाऱ्यांना कळून चुकले. त्यांनी विरोधकांची हवा काढण्यासाठी या नाट्यातील प्रमुख पात्रांनाच मूक करण्याचा पवित्रा घेतला.

Govind Gaude & Ramesh Tawadakar
Goa Politics: राज्य सरकारने घेतलेले कर्ज कायद्यानुसार आहे का? : युरी आलेमाव

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे कामाला लागले. त्यांनी तवडकर आणि गावडे यांना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावून घेतले. त्या चौघांत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी गोव्यात आहेत. त्यावेळी या विषयावरून गदारोळ झाला, तर माध्यमांत त्यांना मोठी प्रसिद्धी मिळेल आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर सारेकाही आलबेल नाही, हे चित्र अकारण पोचेल असे या दोन्ही नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

या बैठकीत गावडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कार्यक्रम झालेच नाहीच, असे धादांत खोटे माध्यमांसमोर सभापतिपदावरील व्यक्ती कशी काय सांगू शकते, अशी विचारणा त्यांनी केली. तवडकर यांनी सरपंच सांगतात ते खोटे कसे मानायचे असा पवित्रा घेतला.

Govind Gaude & Ramesh Tawadakar
Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अबाधित; मुख्यमंत्री प्रमोद सावंत...

हे दोन्ही नेते मागे हटण्यास तयार नव्हते. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वादाचा राजकीय फायदा विरोधक घेतील, असे त्यांना समजावले. या विषयावर कोणती चौकशी अथवा जे काही करायचे असेल ते मला सांगा पण जाहीरपणे बोलू नका, असे सुचवले. अखेर पक्षीय हितासाठी हा विषय जास्त ताणून न धरण्याचे दोघांकडूनही ठरवण्यात आले आणि बैठक संपली.

अनेकांकडून आश्चर्य!

विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी जाहीरपणे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याकडून विशेष अनुदानाचा दुरुपयोग झाल्याचा आरोप केल्याच्या ७२ तासांत भाजपने प्रकरण मिटवून टाकले. यामुळे या विषयावरून स्थगन प्रस्ताव आणून विधानसभेत चर्चा करण्याची विरोधी आमदारांची इच्छा अपूर्णच राहिली. या प्रकाराबाबत काय होणार? याचीच गोवाभर चर्चा अधिक होती. पण विधानसभेत या विषयावर वेगळे काहीच घडलेच नाही. त्यामुळे अनेकांनी या प्रकाराबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले.

...चर्चा नाहीच!

बैठकीनंतर तासाभरात सुरू झालेल्या विधानसभेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि सरदेसाई यांनी हा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. हा विषय जनतेच्या पैशाच्या गैरवापराचा असल्याने विषय गंभीर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र सभापतींनीच चर्चेला परवानगी न देता कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा प्रश्न पुकारला. त्यांनी तो प्रश्न विचारला आणि विधानसभेपुरता हा विषय गुंडाळला गेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com