Illegal Business: मार्ना-शिवोली पंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा सरपंच अभय शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पंचक्रोशीत बेकायदा व्यवसाय थाटून बसलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठवला.
त्याचप्रमाणे मुख्य रस्त्याच्या बाजूला बसून पावलोपावली मासे विक्री करणाऱ्या कर्नाटकी लोकांमुळे अपघातांची शक्यता असल्याने त्यांना आवर घालण्याची मागणी उपस्थितांनी केली.
पंचायत क्षेत्रातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू असून वाडी-शिवोलीत खुलेआम डोंगरकापणीचे प्रकार आता नित्याचेच झाल्याचे ग्रांमस्थांनी पंचायत मंडळांच्या नजरेस आणून दिले.
सरपंच अभय शिरोडकर यांनी यापुढे असले प्रकार होणार नाहीत याकडे पंचायतीचे पूर्ण लक्ष राहणार असल्याचे सांगितले व येथील परिसराची पाहणी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पंचायत पुढाकार घेणार असल्याचे सभेला आश्वासन दिले.
स्थानिक ग्रामस्थ उद्देश पांगम यांनी शिवोली पंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या बहुतेक दुकानांत बंदी असलेल्या कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यात येत असल्याचे सांगितले तसेच पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी लोकांना बेकायदा दुकाने तसेच सदनिका देऊन अनेकजण पंचायतीचा कर बुडवत असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर सामाजिक कार्यकर्ते व्हिक्टर डिसोझा यांनी पंचायत मंडळ याबाबतीत गंभीर राहून दोषींवर कारवाई केल्यास मोठ्या प्रमाणात पंचायतीस महसूल प्राप्त होणार असल्याचे सांगितले.
गुन्हेगारी वाढण्याची भीती
स्थानिकांच्या गाफीलपणामुळे या भागात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शिरकाव करण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मार्ना-शिवोली ते चोपडे पुलाच्या आरंभापर्यंत मुख्य रस्त्याला लागून असलेल्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केलेल्या लोकांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष अमृत आगरवाडेकर यांनी केली.
‘सीसीटीव्ही’चा तपशील मांडा
स्थानिक ज्योकिम बार्रुस यांनी २०२१ साली पंचायत मंडळाकडून विकत घेण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात कार्यान्वित करण्याबरोबरच त्यांचा तपशील सभेसमोर मांडण्याचा आग्रह धरला. यावर पंचायत सचिव सुभाष कांबळे यांनी सीसीटीव्ही खरेदीचा तपशील पंचायत कार्यालयात सादर करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.