

पणजी: नगर व ग्राम नियोजन कायद्यातील कलम ३९अ अंतर्गत झालेल्या जमीन रूपांतरणांविरोधात गावागावांत जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा आमदार वीरेश बोरकर यांनी केली.
‘गोवा वाचवा’ या घोषवाक्याखाली काढण्यात आलेल्या मोर्चाच्या समारोपप्रसंगी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत जनतेने एकत्र येण्याचे आवाहन केले. अटल सेतू परिसरातून मोर्चाला सुरवात झाली.
शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरी काढल्यानंतर मोर्चाचे आझाद मैदानावर विसर्जन करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, शेतकरी, भूमिपुत्र आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाला संबोधित करताना बोरकर म्हणाले की, कलम ‘३९अ’च्या माध्यमातून राज्यातील मोठ्या प्रमाणावर जमिनींचे रूपांतरण करण्यात आले असून त्यामुळे गोव्याची पारंपरिक ओळख, पर्यावरणीय समतोल आणि स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत आहे. जमीन रूपांतरणाच्या प्रक्रियेत सामान्य नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
राज्यातील विविध गावांमध्ये ज्या ठिकाणी ३९अ अंतर्गत जमीन रूपांतरण झाले आहे, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन जनजागृती आणि आंदोलन उभारण्यात येईल, असे बोरकर यांनी स्पष्ट केले. हा केवळ एका भागाचा किंवा एका समाजाचा प्रश्न नसून संपूर्ण गोव्याच्या अस्तित्वाशी संबंधित विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बोरकर यांनी सरकारवर टीका करताना विकासाच्या नावाखाली भूमिपुत्रांच्या जमिनी, नैसर्गिक साधनसंपत्ती व पर्यावरण धोक्यात आणले जात असल्याचा आरोप केला. गोव्याच्या भवितव्यासाठी सर्व राजकीय, सामाजिक आणि लोकचळवळीतील घटकांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मोर्चादरम्यान ‘गोवा वाचवा’, ‘जमीन वाचवा’, ‘३९अ रद्द करा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.