Water Issue: कुपनलिकेत बिघाड झाल्याने विळियण, कुमारी, व्हालसेवासीयांना नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसापासून बंद आहे. त्यामुळे पाणी पुरवठा खात्याच्या कारभाराला कंटाळून काल अखेर विळियणवासीयांनी सांगे पाणी पुरवठा विभागावर धडक देऊन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
सुरळीत पाणी पुरवठा न केल्यास पुढील कृती करू,असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला. त्यावर सोमवारपासून कोणत्याही स्थितीत सुरळीत पाणी पुरवठा करू,असे आश्वासन पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता सुबोध शिरोडकर यांनी दिले.
गेले आठ दिवस पाण्याविना ग्रामस्थांनी हाल सहन केले. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या टँकरद्वारे पुरविले जाणारे पाणी घरातील वयस्करांना आजच्या स्थितीत घरी घेऊन जाणे शक्य होईना.
टँकर रस्त्यावर आणि त्या पासून लांब अंतरावर घरे असल्यामुळे डोकीवर भांडी घेऊन पाणी नेण्याची ज्यांना शक्य होत नाही, अशा वयस्कर महिलांनी आपली कैफियत अधिकाऱ्यांसमोर मांडली.
यावर तोडगा काढण्या साठी नवीन कुपनलिका खोदण्यासाठी नवीन जागा आणि कंत्राटदार निश्चित केला असून तातडीने कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्याच बरोबर दुसरा पर्याय म्हणून ‘जायका’ प्रकल्पांतर्गत जोडणी करण्यात येणार आहे.
कोणत्याही स्थितीत सोमवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करून हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन निवेदन सादर करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देण्यात आले. यावर ग्रामस्थांचे समाधान झाले नसून हलगर्जीपणा केल्यास आम्ही पुढील कृती करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
विळयण ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पुरवठा विभागाने तातडीने पावले उचलावीत,अशी मागणी पंच सदस्य अश्विनी गावकर यांनी केली. नंद गावकर, दीपाली नाईक, पूजा नाईक, प्रदीप वेळीप, अंकित नाईक, प्रमिला गावकर सहित पस्तीसपेक्षा अधिक ग्रामस्थ निवेदन देण्यासाठी आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.