Vijay Kenkare's Task Force Highlights Flaws in Kala Academy Renovation
कला अकादमीच्या नूतनीकरणाचा दर्जा ‘उत्तीर्ण’ होण्याच्याही योग्यतेचा नाही, अशा कठोर शब्दांत ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांनी केलेली मीमांसा सारे काही आलबेल असल्याचे चित्र उभे करण्यासाठी धडपडणाऱ्या सरकारातील बेमुर्वत व मस्तवाल घटकांना सणसणीत चपराक आहे. कला अकादमीची प्राथमिक पाहणी केल्यानंतर जे समोर दिसले ते हलक्यात घेण्यासारखे नव्हते आणि ती खंत केंकरे यांनी सडेतोडपणे मांडली. ‘पैसे खाऊन काम झाले आहे’, इतकेच काय ते म्हणायचे बाकी होते.
कला अकादमीला प्राण मानणाऱ्या कलोपासकांनी जेव्हा जेव्हा जीव तोडून वास्तवभान देण्याचा प्रयत्न केला ही माणसे काहींना शत्रूवत भासली. खुद्द सरकारने कला अकादमीत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने दुरवस्थेवर शिक्कामोर्तब केल्याने पलटवार करण्याची इच्छा असूनही झारीतील शुक्राचार्यांना आता शांत राहण्यावाचून गत्यंतर नाही.
सरकार नियुक्त समिती केंकरे यांच्या आधिपत्याखाली काम करत आहे. केंकरे हे कोणी किरकोळ व्यक्तिमत्त्व नाही. मराठी रंगभूमीवर प्रायोगिक प्रवाह आणण्यात त्यांचा मौलिक वाटा आहे. रंगभूमी चळवळीसाठी त्यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे. त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र, मात्र अंगी रक्त गोमंतकीय आहे.
त्यांचे वडील दामू केंकरे हे कला अकादमीचे पहिले सदस्य सचिव होते. आई ललिता यादेखील रंगकर्मी होत्या. विजय यांचा जागतिक रंगभूमीचा दांडगा अभ्यास आहे. गोव्याशी नाळ आणि रंगभूमीच्या प्रदीर्घ अनुभवाने संपन्न केंकरे यांनी नोंदवलेली मते खोडण्याचा उद्दामपणा कुणी केल्यास तो अंगाशीच येईल.
सरकारने कला अकादमीची स्थिती गंभीरपणे विचारात घ्यायला हवी. यानिमित्ताने विष्णू वाघ यांची याद आल्याशिवाय राहत नाही. ते हयात असते तर अकादमीचे लचके सोडाच, दिशाहीन धोरणकर्त्यांना नियोजनाशिवाय अकादमीची एक वीट हलवू दिली नसती. ‘वाघां’च्या पश्चात कोल्हे, लांडग्यांना मोकळे रान मिळाले, हे कला क्षेत्राचे दुर्दैव. ‘कला राखण मांड’ने उभारलेल्या आंदोलनामुळे समिती स्थापन करून त्यांनी केलेल्या सूचना विचारात घेण्याचे आश्वासन सरकारने यापूर्वीच दिले आहे.
केंकरे आणि समितीची संबंधित ठेकेदारांसोबत होणाऱ्या चर्चेअंती ‘पुढे काय करायचे?’ हे ठरू शकेल. दोषनिश्चिती करून त्या-त्या विषयातील तज्ज्ञांचे साह्य घेण्याचे सुतोवाच समितीने केले आहेच. अकादमीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसे पाऊल उचलावेच लागेल. परंतु त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हे दिवस पाहावे लागले, त्या ठेकेदारांवर काय कारवाई होणार? नव्या तज्ज्ञांवर होणारा खर्च दोषींकडून वसूल होणार का, याची उत्तरे सरकारने जाहीर करावीत.
कामात अक्षम्य त्रुटी आहेत, परिणामी तेथे भ्रष्टाचार झालेला नाही, हे मान्य कसे करावे? ज्या समस्या ‘कला राखण मांड’ने काही महिन्यांपूर्वी दाखवल्या होत्या, त्या आजही कायम राहत असतील तर सरकारी यंत्रणेने इतक्या दिवसांत केले काय? कला अकादमीत माईक व ध्वनियंत्रणेचा वापर न करता शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोहोचत असे. देशातील नावाजलेल्या ‘इकोस्टिक’ सभागृहांपैकी कला अकादमी एक होती.
नूतनीकरणानंतर मुख्य सभागृहातील ‘आवाज’ बसला. वातानुकूलन यंत्रणा जिथे बसवाली, त्याचे ‘हमिंग’ कलाकारांना गोंधळात टाकते. ब्लॅक बॉक्समध्ये प्रकाशयोजना नसल्यात जमा. केंकरे यांनी अशा मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत, नॅशनल थिएटर लंडनशी तुलना होणाऱ्या कला अकादमीची रया पुरती हरवली असताना तेथेच ‘अ’ गट नाट्यस्पर्धेचे आयोजन करणे कितपत योग्य आहे? असे मुखलेपन टिकणारे नाही. त्यातून काही सिद्ध होण्यापेक्षा रंगकर्मींचे नुकसान होईल. असले उद्योग करण्यापेक्षा दोषमुक्त अकादमी कलाकारांसाठी उपलब्ध करून द्या.
कला अकादमीचा आत्मा जपणे सरकारचे कर्तव्य आहे. कला अकादमीचे नूतनीकरण हा भ्रष्टाचार आहे, असे मानण्यास बरीच जागा आहे. सरकार नियुक्त समितीच्या पुढील बैठकांमधून ते स्पष्ट होईल, अशी आशा आहे. ‘आयआयटी’चा शोध अहवाल कधी आलाच नाही; मात्र समितीच्या अहवालावर कार्यवाही केल्यासच अनुत्तीर्ण ते उत्तीर्ण प्रवास शक्य आहे. कला क्षेत्रात पारदर्शकता हवीच.
आजवर स्थापन झालेल्या आयोग व समित्यांची मते, निर्णय सरकारवर बंधनकारक नाहीत, हेच प्रत्येक सरकारने दाखवून दिले आहे. पण, प्रश्न जेव्हा कला क्षेत्रातील गोव्याचा मानबिंदू असलेल्या वास्तूचा येतो, तेव्हा सरकारला समितीची प्रत्येक सूचना जाहीर करावी लागेल. इतकेच नव्हे तर अंमलबजावणी का केली, का केली नाही, हेही सांगावे लागेल. कला अकादमी म्हणजे गोव्याच्या खानदानी कलोपासनेचा गोविंदविडा आहे; त्याचे सेवन करण्यासाठी विष्णूचे सत्त्व लागते आणि देण्यासाठी लक्ष्मीची चारित्र्यसंपन्नता. चघळून थुंकण्याचा हा विषय नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.