

पणजी: गोव्यातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बिट्स पिलानी' (BITS Pilani) गोवा कॅम्पसवरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी या संस्थेच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ही संस्था बेकायदेशीर असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या संस्थेमुळे स्थानिक गोवेकरांना नेमका काय फायदा होतोय, असा रोखठोक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
विजय सरदेसाई यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीवर टीका करताना विचारले की, इतकी मोठी राष्ट्रीय स्तरावरील संस्था गोव्याच्या भूमीवर उभी असताना तिथे किती गोमंतकीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत? तसेच, या संस्थेत किती स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत? सरदेसाई यांच्या मते, गोव्याच्या संसाधनांचा वापर करून उभारलेल्या या संस्थेकडून स्थानिकांना कोणताही ठोस लाभ मिळत नाहीये, ही चिंतेची बाब आहे.
केवळ रोजगाराचाच मुद्दा नाही, तर संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही सरदेसाई यांनी गंभीर भाष्य केले. बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये गेल्या काही काळात झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांचा संदर्भ देत त्यांनी संताप व्यक्त केला. यांसारख्या दुर्दैवी घटनांमुळे गोव्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर खराब होत असून, शैक्षणिक केंद्र म्हणून राज्याची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सर्वात मोठा आरोप करताना सरदेसाई यांनी या संस्थेला 'बेकायदेशीर' ठरवले आहे. ही संस्था ज्या जमिनीवर किंवा ज्या नियमांच्या आधारे कार्यरत आहे, त्यामध्ये मोठ्या त्रुटी असल्याचा त्यांचा दावा आहे. "जर एखाद्या संस्थेचा फायदा राज्याला आणि तिथल्या जनतेला होत नसेल, तर तिचे अस्तित्व कशासाठी?" असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.