पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून 'कॅश फॉर जॉब' प्रकरणावरुन राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. विरोधक सातत्याने सावंत सरकारला याप्रकरणी धारेवर धरत आहेत. जोपर्यंत याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला जाब विचारत राहू, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी (25 डिसेंबर) गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी पुन्हा एकदा सावंत सरकारवर निशाणा साधला. सरदेसाई म्हणाले की, ''कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन गोमंतकीयांचे लक्ष विचलीत करण्याचे मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. परंतु त्या मॅडमला पकडून देण्याचा गोमंतकीय जनतेने निर्धार केला आहे. आम्ही या मॅडमला पकडल्यावाचून राहणार नाही. ही मॅडम नेमकी कोण त्याची पूर्ण माहिती आमच्या हातात येऊ द्यात. त्यानंतरच मी जाहीररित्या भाष्य करेन.''
राज्यात सध्या नोकऱ्यांच्या चोरबाजाराचा विषय गाजत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपणच प्रथम याविषयी पूजा नाईक हिला पकडून दिले, असा दावा केला होता. एवढ्यावरच न थांबता त्यांनी जनतेला अशा प्रकारांविषयी तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले होते.
तरीही त्यांनी अशा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची तयारी दर्शविलेली नाही. विशेष तपास पथक स्थापन केलेले नाही. पोलिसही नोकऱ्यांसाठी घेण्यात आलेले पैसे कोणापर्यंत पोहोचले, ते शोधून काढू शकलेले नाहीत.
दुसरीकडे, संशयितांना जामीन मिळाल्याने फसवणुकीच्या प्रकरणांतून फारसे काही निष्पन्न होईल, असे जनतेला वाटत नाही. बहुतांश व्यवहार रोखीने झाल्याने ते न्यायालयात सिद्ध करणे अवघड होईल, याची कल्पना पटापट मिळू लागलेल्या जामिनांवरुन संबंधितांना आली आहे. या विषयावरुन विरोधक एकवटले आहेत. शिवाय, भाजपमधील (BJP) एका गटाला सरकारने निष्पक्षपातीपणे हे प्रकरण हाताळले, असे वाटत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.