

वास्को: केळशी- वेर्णा हद्दीत शुक्रवारी (ता.१२) दुपारी लागलेल्या आगीनंतर या भंगारअड्ड्याचा एक मालक शरीफ याने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे जुझे यांच्या कुटुंबीयांनी तसेच आणखी दुसरा एक भंगारअड्डावाला रिजायुन यांनी सांगितले.
शरीफ याने कोमुनिदादच्या जमिनीवर अवैधरीत्या कब्जा केला होता. त्याचप्रमाणे तेथील लोकांना तो धमक्या देतो. तो जमिनीसाठी जुझे याला कोणतेही भाडे देत नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हे भंगारअड्डे हटवण्यासंबंधी केळशी पंचायत गंभीर आहे, त्यासाठी नोटिस देण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे व वीज खात्याचे संबंधित काही कारणास्तव तेथे न आल्याने कारवाई होऊ शकली नाही. तेव्हा जर कारवाई झाली असती तर कालची घटना घडली नसती अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हे भंगारअड्डे हटविण्यासंबंधी कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझही गंभीर आहेत. त्यांनी हे भंगारअड्डे हटविले गेलेच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.
शुक्रवारी दुपारी आग लागल्यावर तेथे उपस्थित असलेला एक भंगारअड्ड्यावाला शरीफ याने या आगीमागे घातपात असून संशयित म्हणून रिजायुनचे नाव उघडपणे घेतले होते. त्याचप्रमाणे आपण या जमिनीचे भाडे जुझे याला देत असल्याचा दावा केला होता. मात्र त्याने केलेल्या आरोपांना उत्तर देताना जुझे यांच्या पत्नी व मुलीने तसेच रिजायुन यानी सर्व दावे खोडून काढले आहेत.
आग लावण्यात आपला हात नाही
रिजायुन याने ती आग लावल्यामागे आपला हात नसल्याचे सांगितले. आग लागली होती तेव्हा मी नमाजासाठी मशिदीमध्ये होतो. यासंबंधी साक्ष देणारे दहाजण तरी मिळतील असा दावा त्याने केला आहे. आपल्याला या प्रकरणात नाहक गुंतविण्याचा डाव शरीफ खेळत असल्याचा आरोप त्याने केला.
पाचजणांचे भंगारअड्डे
शुक्रवारी ज्या भंगारअड्ड्यांना आग लागली, तेथे पाचजणांचे भंगारअड्डे आहेत. जेथे भंगारअड्डे उभारण्यात आले आहेत, ती जागा कोमुनिदादची आहे. त्या जागेवर संबंधितांना भंगारअड्डे उभारण्यास कोणी मदत केली होती, याचा शोध घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
तिघांवर गुन्हा दाखल
केळशी-वेर्णा हद्दीतील भंगार अड्ड्यांना दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीप्रकरणी एक पीडित भंगारअड्डेवाला शरिफ हस्सन याने केलेल्या तक्रारीनुसार वेर्णा पोलिसांनी रिझायुल मुस्ताफा यांच्यासह इतर तीनजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. रिझायुलने आग लावल्याचा संशय शरिफ याने व्यक्त केला होता. या आगीमुळे एकवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्याने व्यक्त केला आहे.
दवर्ली येथे राहणारा शरिफ याचा केळोशी- वेर्णा हद्दीत भंगारअड्डा आहे. या भंगारअड्यालगत इतर चार असे एकूण पाच भंगारअड्डे आहेत. त्या भंगारअड्ड्यांमध्ये मुस्ताफा याचाही एक भंगारअड्डा आहे. तेथे १२ रोजी दुपारी बारा ते एक दरम्यान आग लागली होती. सदर आगीमध्ये रिझायुल वगळता इतर भंगारअड्ड्याचे मोठे नुकसान झाले आहे.
शरिफ व मुस्ताफा यांच्यामध्ये भंगारअड्यांसाठी सतत भांडणे होत होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये वैर निर्माण झाले होते. ता. १२ रोजी आपण नमाजासाठी मशिदीमध्ये गेलो असता, मुस्ताफा व त्याच्या साथीदारांनी आग लावून तेथून पळ काढल्याचे काहीजणांनी पाहिल्याचे शरिफ यांनी सांगितले होते.
या आगीत आपल्या भंगारअड्ड्यातील भंगार साहित्य जळाल्याने सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले. तर इतर तिघांचे भंगारअड्डे आगीत खाक झाल्याने त्यांचे वीस लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार शरिफ यांनी केली होती. निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र नाईक पुढील तपास करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.