

वास्कोतील भीषण आगीने अनेक विक्रेत्यांचे संसार उद्ध्वस्त केले. दिवाळीच्या हंगामासाठी कर्ज काढून आणलेला माल क्षणात जळून खाक झाला. आता पुढे कसे जगायचे, उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेने विक्रेते हतबल झाले आहेत. लहान मुलांना कवटाळून आक्रोश करणाऱ्या महिला विक्रेत्यांचे अश्रू काळीज पिळवटून टाकणारे होते. सणाच्या आनंदाऐवजी त्यांच्या वाट्याला आलेले दुःख आणि अंधार मन सुन्न करणारा आहे.
वास्को: येथील बाजारात बुधवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत दीडशेहून अधिक दुकाने जळाल्यामुळे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या संकटामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. आयुष्यभराची कमाई गमावलेल्या विक्रेत्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले आहे.
दिवाळीला आणलेला माल जळाला
सूरज आणि क्रतन नाईक या व्यापारी बंधूंनी २५ ऑक्टोबरला दिवाळीसाठी कर्ज काढून आणलेला तयार कपड्यांचा साठा आगीत भस्मसात झाला. त्यामुळे त्यांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले. दिवाळीला होणाऱ्या व्यवसायातून कर्ज फेडण्याचे त्यांचे नियोजन होते; मात्र आगीने सर्व काही हिरावून घेतले. विमा नसल्याने नुकसान भरून कसे काढायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
दोन दिवसांत पर्यायी जागेचे आश्वासन
आपद्ग्रस्त फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले. संबंधित संघटनेशी चर्चा करून दोन दिवसांत पर्यायी जागेची व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, जागा उपलब्ध होण्याबरोबरच विक्रेत्यांच्या नुकसानीची भरपाई आणि व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीचा प्रश्नही महत्त्वाचा आहे.
आमदार साळकर देणार स्वत:चे दोन वर्षांचे वेतन
खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी ही दुर्घटना ‘आपत्ती’ म्हणून जाहीर करून पीडितांना पूर्ण नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देत घटनेची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. आमदार दाजी साळकर यांनी आपले दोन वर्षांचे वेतन आपद्ग्रस्तांना देण्याचे जाहीर केले.
अग्निशमन दलाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
आग विझविण्यासाठी राज्य अग्निशमन दलासह गोवा शिपयार्ड, नौदल, मुरगाव बंदर प्राधिकरण, दाबोळी विमानतळ आणि झुआरी ॲग्रो केमिकल्सचे बंब बोलावण्यात आले. मात्र, बंबांच्या ये-जा व्यवस्थापनात अडथळे आल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला. वास्को अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली नसल्याचाही आरोप झाला. या आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे.
राजकीय नेत्यांनी घेतली धाव
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मंत्री माविन गुदिन्हो, अग्निशमन दलाचे नितीन रायकर, जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर , प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रतीक्षा खलप, ‘आप’चे वाल्मिकी नाईक तसेच इतर नेत्यांनीही पाहणी केली.
स्वतःच्या खर्चाने मार्केट बांधून देणार : कमलाप्रसाद
वास्कोतील भीषण आगीत मार्केटमधील दुकाने जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते कमलाप्रसाद यादव यांनी स्वतःच्या खर्चाने नवीन मार्केट बांधून देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळू शकते. आगीत सर्वस्व गमावलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी हा पुढाकार जाहीर केला असून, त्यांचे काैतुक होत आहे.
फायर हायड्रंट असूनही निरुपयोगी!
‘संडे मार्केट’ परिसरातील फायर हायड्रंट आगीच्या वेळी उपयोगात आणता आले नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला. अग्निशमनासाठी असलेल्या या यंत्रणेचा प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत उपयोग का झाला नाही, ती कार्यरत होती का आणि तिची नियमित देखभाल केली जात होती का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
विमा नाही; नुकसान भरपाईचे काय?
वास्कोतील आगीत सर्वस्व गमावलेल्या अनेक विक्रेत्यांकडे मालाचा विमा नव्हता. दिवाळीसाठी कर्ज काढून आणलेला माल जळून खाक झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. विम्याचे संरक्षण नसल्याने नुकसान भरपाई मिळविण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. आयुष्यभराच्या कमाईवर पाणी फिरल्याने व्यवसाय पुन्हा उभा करायचा कसा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा वाढली आहे.
दुर्घटना ‘राज्य आपत्ती’ घोषित करा
आपद्ग्रस्त विक्रेत्यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. आम्हांला इतरत्र कुठेही स्थलांतरित होण्याची अजिबात इच्छा नाही. जुनी बाजारपेठेची जागाच पूर्ववत करून ती आम्हांला परत मिळवून देण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर काम करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन या दुर्घटनेला ‘राज्य आपत्ती’ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली.
सुमारे दीडशे विक्रेत्यांचे संसार उद्ध्वस्त
‘संडे मार्केट’च्या पहिल्या मजल्यावरील सुमारे दीडशे फेरीवाल्यांचा माल आगीत जळून खाक झाला. दिवाळीच्या हंगामासाठी मोठ्या प्रमाणात नवीन कपडे आणि अन्य वस्तूंचा साठा करण्यात आला होता. काही विक्रेत्यांचे पाच ते दहा-बारा लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधारच आगीने हिरावून घेतला.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही रोखले
दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपद्ग्रस्त संडे मार्केट आणि आसपासच्या पाच मीटर परिसरात नागरिक, व्यापारी व विक्रेत्यांच्या प्रवेशावर प्रतिबंध घालणारा आदेश जारी केला. या आदेशाच्या अंमलबजावणीदरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी रोखल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.