Goa News: वास्को शहरातील टी. बी. कुन्हा चौकात मंगळवारी सायंकाळी लहान मुलाचे अपहरण करीत असल्याचा आरोप करत लोकांनी एकाला जबर चोप दिला. मात्र, वेळीच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला जमावाच्या तावडीतून सोडविले. अखेर मारहाण करण्यात आलेला इसम मनोरुग्ण असल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली.
सध्या गोव्यासह इतर राज्यांतही लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांमार्फत सोशल मीडियावर फिरत आहे. सर्व पालकांनी आपल्या मुलांना सांभाळावे, अशा संदेश पोलिसांनी यानिमित्ताने दिला आहे.
त्यातच मंगळवारी सायंकाळी 5 वाजता वास्कोतील टी. बी. कुन्हा मासळी मार्केटच्या बाजूला एक इसम लहान मुलाचे अपहरण करीत असल्याची आरडाओरड सुरू होताच जमावाने त्या इसमाला चोपायला सुरुवात केली. मुलांचे अपहरण करीत असल्याचा आरोप करत लोकांनी त्या इसमाला दंडुके, लाथा-बुक्क्यांनी अर्धमेला केला. अखेर पोलिसांचे गस्त घालणारे वाहन तेथे आल्यामुळे तो बचावला.
संशयित व्यक्तीची चौकशी केल्यावर त्याने त्याचे नाव धेन जोन्स, वय 52 वर्षे पाँडिचेरी असे सांगितले. चौकशीत तो समाधानकारक उत्तरे देत नव्हता आणि तो मानसिकदृष्ट्या अस्थिर दिसत होता, त्यामुळे त्याची योग्य काळजी घेण्यासाठी त्याच्याकडे कोणीही नव्हते. भविष्यात कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी संशयित व्यक्तीला मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे की नाही हे तपासण्यासाठी एसडीएच चिकालीम येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
वैद्यकीय तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्याने तो मानसिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आणि पुढील उपचारांसाठी त्याला IPHB मध्ये दाखल करणे आवश्यक आहे. न्यायदंडाधिकारी वास्को यांच्याकडून योग्य आदेश मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला दाखल करण्यात येणार आहे.
चौकशी न करताच धुलाई
राज्यात मुलांना पळवणारी टोळी वावरत असल्याचे मॅसेज समाजमाध्यमांवर फिरत आहेत, तसेच डिचोली, वाळपई येथे अशा काही घटना घडल्यामुळे आधीच लोक धास्तावले आहेत. त्यातच मनोरुग्णाने मुलाला नेले, असे समजून लोकांनी चोपले.
मुलाला आशीर्वाद देत होता पण... त्या इसमाला वास्को पोलिस स्थानकावर चौकशीसाठी आणले असता, तो मनोरुग्ण असल्याचे समजले. मनोरुग्णाने, आपण त्या मुलाला फक्त आशीर्वाद देत होतो, अशी माहिती पोलिसांना दिली. अखेर त्या इसमाला पोलिसांनी तपासणीसाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात पाठवले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस हवालदार आशिष नाईक करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.