

पणजी: वास्को शहरात एखादा प्रकल्प आणायचा म्हटले, तरी जागा उपलब्ध होत नाही. अपुऱ्या जागेमुळे अनेक प्रकल्प अन्यत्र हलवावे लागतात. असे असताना कंदबा स्थानकावरील २९ हजार २४३ चौरस मीटरपैकी २० हजार चौरस मीटर जमीन नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीला (एनबीसीसी) पीपीपी तत्त्वावर देण्यात येणार आहे.
या प्रकल्पातून ३० टक्के नफा सरकारला, तर ७० टक्के नफा संबंधित कंपनीला देण्यात येणार आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध असून, प्रसंगी विरोधासाठी रस्त्यावर उतरण्यासही मागे हटणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जुझे फिलिप डिसोझा यांनी सांगितले. पणजी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी अविनाश भोसले व इतर उपस्थित होते.
दरम्यान, डिसोझा म्हणाले, वास्को शहरातील सरकारी कार्यालये सध्या भाड्याच्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत. माझ्या कार्यकाळात ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी उभारण्यासाठी प्रशासकीय इमारत प्रकल्प आणला होता; परंतु नंतर आमदार बदलल्यामुळे तो रखडला. जनतेच्या हिताचे प्रकल्प आणा, आम्ही त्यांना सहकार्य करू; मात्र अशा प्रकारच्या प्रकल्पांना आमचा विरोध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी जमीन म्हणून तिचा वापर कसा करायचा, याचा विचार करणार नाही का? कोणत्याही दरात कितीही जमीन देणार का? जर ३० टक्के नफा जमीन मालकाला आणि ७० टक्के नफा प्रकल्पधारकाला या तत्त्वावर सरकारी जमीन देण्यात येत असेल, तर वास्कोच्या आमदारांनी स्वतःच्या जमिनीत हा प्रकल्प उभारावा, असे जुझे फिलिप डिसोझा यांनी सांगितले.
शहरात वाहनांचा बोजा वाढणार
हा प्रकल्प उभारल्यास वास्को बसस्थानक शहराच्या मध्यवर्ती भागातील एचपीसीएलच्या जागेत हलवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी वाढेल. त्याचबरोबर वास्कोतील नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना माझी विनंती आहे की, हा प्रकल्प रद्द करण्यात यावा. वास्कोच्या तसेच गोमंतकीय जनतेच्या हिताचे प्रकल्प आणा; आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मात्र, हा प्रकल्प आम्हाला मान्य नाही, असे डिसोझा यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.