

डिचोली: पंचशताब्दी वर्षांचा इतिहास असलेल्या वरगाव-पिळगाव येथील श्री चामुंडेश्वरी देवीचा जत्रोत्सव येत्या शुक्रवारपासून (ता. २ जानेवारी) साजरा करण्यात येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जत्रोत्सवाचे खास आकर्षण असलेला देवीचा प्रसिद्ध ‘नौकाविहार’ उत्सव रविवारी (ता.४) साजरा होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष तुषार टोपले यांनी दिली.
श्री चामुंडेश्वरी देवी ही गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील मिळून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शुक्रवारी (ता.२) सकाळपासून धार्मिक विधी, रंगपूजा, पुराण वाचन आणि पालखी उत्सव होणार आहे. शनिवारी (ता.३) सकाळी महापूजा, रंगपूजा, पुराण वाचन, दीपस्तंभ पूजा, खेत्र, पालखी आणि महाआरती होणार आहे. रात्री ८ वा. मोहनदास पोळे आणि साथी कलाकारांचे भजन होणार आहे.
रविवारी (ता.४) कालोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी श्री चामुंडेश्वरी देवी आणि पंचायतन देवतांस महाअभिषेक आणि महापूजा होणार आहे. सकाळी ८.३० वा.पासून भाविकांना स्वहस्ते अभिषेक तसेच सुवासिनींना कुंकूमार्चन करण्याची संधी देण्यात येईल.
याशिवाय ओटी भरणे, नवस फेडणे आदी विधी होणार आहेत. दु. १ वा. आणि रात्री ८ वा. महाप्रसाद होणार आहे. रात्री ११.३० वा. बॅण्डवादन आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी मिरवणूक होणार आहे. नंतर मंदिराजवळील तलावात ‘नौकाविहार’ होणार आहे. पालखी मंदिरात आल्यानंतर दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
सोमवारी (ता.५) रोजी सकाळी दहीहंडी झाल्यानंतर पालखी, महाआरती आणि सार्वजनिक गाऱ्हाणे घालून कालोत्सवाची सांगता होणार आहे. नंतर महाभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवारी (ता.६) सकाळी महाभिषेक, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सायं. ७ वा. पालखी आणि आरती झाल्यानंतर चामुंडेश्वरी संगीत विद्यालयाच्या महिला कलाकारांतर्फे संजय फाळकर लिखित व दिग्दर्शित ‘सं. दीपवाली’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.