Goa Politics: खरी कुजबुज; म्हावळिंगेत जागेचे गौडबंगाल

Khari Kujbuj Political Satire: गणेशपुरी म्हापसा येथे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खोलकर राहतात. एरव्ही फारसे तसे ते चर्चेत नसतात. त्यांच्या घरी कोणी गेले म्हणून त्याची कधी बातमीही होत नाही.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

म्हावळिंगेत जागेचे गौडबंगाल!

म्हावळिंगे येथे सोमवारी घडलेल्या प्रकाराविषयी सध्या वेगळीच माहिती समोर येत आहे. विरोध का झाला, विरोध करणारे कोण आहेत आणि त्या जागेची मालकी नक्की कोणाची, असे सगळे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. याच ठिकाणी सध्या घडलेल्या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारने सरकारी जागेतील स्थानिकांची म्हणजेत मूळ गोंयकारांची घरे नुकत्याच मंजूर झालेल्या कायद्यानुसार अधिकृत होणार आहेत. परंतु येथील एका टेनंन्टने सरकारी जागा आपल्याची मालकीची म्हणून महाराष्ट्रातील लोकांना विकली आहे. महाराष्ट्रातील ती जागा घेणारे लोक येथील प्रख्यात कंपनीत कामाला आहेत. ज्या टेनंन्टने ही जागा सर्वांना विकली आहे, म्हणे ही सरकारची आहे आणि ती जागा एका टेनंन्टने हा जागा विक्री व्यवहार करताना लाखो रुपये त्यांच्याकडून घेतले आहेत आणि त्यात जमीन व्यवहारासाठी आवश्यक असणारे पंचायतीपासून ते मामलेतदार कचेरीपर्यंतचे अधिकारी त्या टेनन्टने आपल्या खिशात ठेवले होते. सुमारे ७० भूखंडाची त्या टेन्टने विक्री केली आहे आणि लाखो रुपये मिळविले असले तरी स्वतः टेनंन्टच तेथे बेकायदेशीर राहत असल्याने हे प्रकरण आता काय वळण घेतेय हे पहावे लागेल. ∙∙∙

तवडकर भेटीचे गुपित

गणेशपुरी म्हापसा येथे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खोलकर राहतात. एरव्ही फारसे तसे ते चर्चेत नसतात. त्यांच्या घरी कोणी गेले म्हणून त्याची कधी बातमीही होत नाही. सोमवारी मात्र त्यांचे घर चर्चेत आले. सभापती रमेश तवडकर हे त्यांच्या घरी पोचले. खोलकर हे भाजपच्या गाभा समितीचे सदस्य. सध्या मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा जोरात सुरू आहे. तवडकर हे मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत, हेही लपून राहिलेले नाही. त्यामुळे कोणत्या तरी कामासाठी म्हापसा परिसरात असलेले तवडकर हे खोलकर यांना भेटले या खुलाशावर कोणाचाही विश्वास बसणार नाही अशी स्थिती आहे. ∙∙∙

विजय-आर्थूरचा याराना...

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि मडगावचे माजी नगराध्‍यक्ष आर्थूर डिसिल्‍वा हे जरी दाेन वेगवेगळ्‍या राजकीय पक्षात असले तरी त्‍यांचा याराना बराच आहे. आर्थूरच्‍या कित्‍येक पार्टींना विजयची हजेरी असते तर विजयच्‍या कित्‍येक कार्यक्रमांना आर्थूर उपस्‍थित असतात. परवा रविवारी झालेल्‍या ‘मड वॉरियर्स’ या रेसमध्‍ये आर्थूर आणि विजय एकाच गाडीत बसलेले दिसत होते. यावेळी अशा रेसमुळे लोकांना रस्‍त्‍यांवरील खड्डे चुकवित गाडी कशी चालवावी, याचा चांगला अनुभव मिळेल, अशी प्रतिक्रिया आर्थूर डिसिल्‍वा यांनी व्‍यक्‍त केली. हेच आर्थूर आणि विजय एका निवडणुकीत एकमेकांच्‍या विरोधात रिंगणात होते, असे जर कुणी सांगितले तर त्‍यावर आज कुणाचा विश्‍वास बसेल का? ∙∙∙

‘टिचर्स असोशिएशन’ दबावाखाली?

गोवा विद्यापीठाच्या टीचर्स असोसिएशनने आज पत्रकार परिषद घेतली. विद्यापीठात टीचर्स असोसिएशन असल्याचे त्यानिमित्ताने समजले तरी. कारण मध्यंतरी पेपर फुटीप्रकरणानंतर खरेतर याच टीचर्स असोसिएशनने पुढे येऊन बाजू मांडायला हवी होती. पण तसे काही त्यांनी केले नाही, एकतर ही संघटना विद्यापीठ व्यवस्थापनाला घाबरून असावी असेच दिसते. पेपर लिक प्रकरणानंतर असोसिएशनने कुलगुरूंना भेटून सर्व प्रकाराचे वास्तव सर्वांसमोर मांडायला हवे होते. मुख्य म्हणजे सत्य कितीही विद्रुप असले तरी, ते बाहेर आल्यानंतर दोषींवर कडक कारवाईची मागणी व्हायला हवी होती, सत्य कसे बाहेर आले, हा प्रश्‍न नाही. तसे त्यांनी केले नाही, त्यामुळेच त्या प्रकरणाच्या चौकशी समितीला व्यवस्थापनाकडे बोट दाखवावे लागले आहे. याशिवाय कुलगुरूंनी केलेल्या वक्तव्यानंतरही असोसिएशन स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे आली नाही, आता ही असोसिएशन इतरांना आरोपींच्या कोठडीत उभी करीत आहे. यावरून असोसिएशनला सत्य बाहेर येऊन विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढलेली हवी आहे, की प्रकरण दाबून त्या प्राध्यापकाच्या कारनाम्यांवर कायमचे पांघरूण घालायचे आहे, हा प्रश्‍न उपस्थित होतो. ∙∙∙

भेट अन् राजकीय चर्चा...

राज्य मंत्रिमंडळातून गोविंद गावडे यांना डच्चू दिल्याननंतर, सध्या एक जागा रिक्त आहे. दुसरीकडे, मंत्रिमंडळ फेरबदलावरून प्रसार माध्यमांमध्ये रोज नवनवीन बातम्या ऐकायला मिळताहेत. यातच, सभापती रमेश तवडकर सोमवारी सकाळी म्हापशात, भाजपचे कोअर समितीचे दत्ता खोलकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. या दोघांमध्ये चर्चा ही राजकीय की मित्रत्व भावनेने होती? मात्र, सभापतींच्या या भेटीमुळे राजकीय विश्लेषक व पक्ष कार्यकर्ते विविध अर्थ काढताहेत. त्याचप्रमाणे, संभाव्य राजकीय घडमोडींचे हे जणू संकेत आहेत, अशी चर्चा सुरू झाली. परंतु सत्य हे होते, की सभापतींनी घरे बांधून देण्याची जी मोहीम सुरू केली आहे, त्याचा प्रमुख कार्यक्रम पुढील आठवड्यात पणजीत होत आहे, त्याची आमंत्रणे देण्यासाठी सभापती स्वतःच नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; दिवसभर गायब; पहाटे रेतीचे ढीग!

‘गोमेकॉ’त औषधे नाहीत?

सामान्यतः रुग्णांसाठी जी औषधे सहज उपलब्ध असतात, ती आता गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अनुपलब्ध आहेत, अशी चर्चा सुरू आहे. अनेक रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली काही विशिष्ट औषधे मिळत नाहीत, असा आरोपही केला जात आहे. या औषधांच्या कमतरतेमुळे रुग्णांना अडचणी येत आहेत. काही रुग्णांना तर एक-दोन महिने उलटूनही आवश्यक औषधे उपलब्ध होत नाहीत. यामुळे या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. गोमेकोमध्ये सर्वच औषधांचा तुटवडा नाही, मात्र जी मोजकी पण महत्त्वाची औषधे डॉक्टर लिहून देत आहेत, ती उपलब्ध होण्यात अडचण येत आहे. या प्रकारामुळे रुग्णांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: "गोव्यात एकाच घरात 80 मतदार; आता सरकारचा पर्दाफाश करू" काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

कोण होणार मंत्री?

कोण होणार मंत्री, याविषयी जनतेत उत्सुकता आहे, तशीच ती सचिवालयातही आहे. मुख्यमंत्री सध्या राज्याबाहेर असल्याने थोडे मोकळे वातावरण सचिवालयात दिसते. त्यातही मंत्रिमंडळ फेररचना हा आवडीचा चर्चेचा विषय बनल्याचे दिसते. केवळ गोमंतकीय अधिकारीच नव्हे तर राज्याबाहेरून आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनाही कोण मंत्री होणार याविषयी याविषयी जबरदस्त कुतुहल आहे. संपर्कात आल्यावर ते मंत्री कोण होणार हे विचारण्यास विसरत नाहीत.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com