अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या व्हाळशी-डिचोली रस्त्यावर वारंवार अपघात घडतच आहेत. रस्तारुंदीकरण केल्यानंतरही अपघातांचे प्रकार काही थांबत नाहीत. काल रविवारी पुन्हा एकदा या रस्त्यावर भीषण अपघातात श्रीकांत पळ या ज्येष्ठ नागरिकाला प्राणास मुकावे लागले. व्हाळशी येथे जेथे अपघात घडला, त्या परिसरात उभारलेले रॅम्बलर्स काढल्यामुळेच हा अपघात घडला, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. दरम्यान, या रस्त्यावर आतापर्यंत झालेल्या अपघातांत 25 हून अधिक बळी गेले आहेत.
अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी व्हाळशी येथे आयटीआय परिसरात रॅम्बलर्स उभारण्यात आले होते. मात्र रात्रीच्या वेळी या रॅम्बलर्सवरून अवजड वाहने वेगाने हाकल्यानंतर मोठा आवाज होत होता. त्यामुळे या रॅम्बलर्सना स्थानिकांनी विरोध केला. लोकांच्या विरोधामुळे सहा महिन्यांपूर्वी हे रॅम्बलर्स काढण्यात आले. काल झालेला भीषण अपघात सदर रॅम्बलर्स उभारले होते, त्याच परिसरात घडला. रॅम्बलर्स असते तर कदाचित श्रीकांत पळ यांचा जीव वाचला असता, असेही बोलले जात आहे.
श्रीकांत पळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
काल रविवारी अपघातात बळी मृत्यू आलेल्या श्रीकांत पळ यांच्या पार्थिवावर आज सोमवारी दुपारी स्थानिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मृत श्रीकांत यांच्या नातीवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
गेल्या 8 वर्षांत गमावला 10 जणांनी जीव
अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या व्हाळशी-बोर्डे रस्त्यावर अपघात घडतच आहेत. रस्तारुंदीकरणानंतर गेल्या दोन वर्षांत अपघातांचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र काल झालेल्या भीषण अपघातामुळे हा रस्ता वाहतुकीस असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
कालचा बळी धरून गेल्या आठ वर्षांत या रस्त्याने दहाजणांचे बळी घेतले आहेत. रस्ता अपघातप्रवण क्षेत्र असल्याने वाहनचालकांनी वाहने हाकताना आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. मात्र बऱ्याचदा वाहनचालक नियम पाळीत नाहीत. त्यामुळे निष्पाप बळी जातात, अशी खंत व्हाळशी येथील नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.