वाळपई : गोवा पर्यटन विकास महामंडळ व ब्रिटिश ॲडव्हेंचर स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या गोवा सरकारच्या व्हाईट वॉटर राफ्टिंगला यंदाच्या मोसमात पुढील आठवड्यापासून सुरवात होण्याची शक्यता आहे. सत्तरी तालुक्यातील धावे गावातून या वॉटर राफ्टिंगची पहिली फेरी सुरू होणार आहे.
अजून नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली नाही. त्यामुळे या साहसी खेळास विलंब झाला आहे. मात्र, जर पावसाचा जोर असा कायम राहिला तर पुढच्या आठवड्यापासून हे साहसी व्हाईट वाॅटर राफ्टिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
याबाबतची माहिती अशी की, नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे-सत्तरी या ठिकाणी म्हादई नदीच्या प्रवाहावर काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी व्हाईट वॉटर राफ्टिंग या प्रकल्पाला सुरुवात केली होती. यंदाच्या मोसमात पुढील आठवड्यापासून धावे-सत्तरी येथून या प्रवासाला सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना म्हादई नदीचा दऱ्याखोऱ्यांत असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घेण्याची चांगली संधी निर्माण होत असते.
गावाच्या विकासास मदत
गोवा सरकारच्या गोवा विकास पर्यटन महामंडळाने चांगल्या प्रकारचे सहकार्य दिल्याने व हा स्तुत्य उपक्रम म्हादई नदीच्या प्रवाहावर राबविल्याने याचा अनेक स्तरावर साहसी पर्यटनाला फायदा झालेला आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरापासून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या धावे गावात या उपक्रमाला सुरवात करण्यात आल्यानंतर गावाला वेगवेगळ्या दृष्टीने फायदा होत आहे. यामुळे या साहसी पर्यटनाच्या माध्यमातून गावाच्या विकासाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते.
ग्रामीण पर्यटनाला संधी
अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात साहसी पर्यटक यात भाग घेतात. यामध्ये देशी तसेच परदेशी पर्यटकांचाही प्रामुख्याने समावेश होतो. म्हादई नदीचा प्रवाह साहसी पर्यटनासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने सरकारने ग्रामीण भागातील पर्यटनाला संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने याची सुरुवात केलेली आहे. यामुळे गोव्यातील साहसी पर्यटकांना याचा चांगलाच प्रकारे फायदा झालेला आहे.
सत्तरीत म्हादई नदीच्या पात्रात व्हाईट वॉटर राफ्टिंग सुरू करुन आम्हाला संधी दिलेले आहे. राज्याबरोबरच इतर राज्यांतील पर्यटकांना वेगळ्या प्रकारचा अनुभव देणारी ही प्रक्रिया आहे. मात्र, यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे म्हादई नदीत पाण्याची पातळी वाढलेली नाही. त्यामुळे या उपक्रमाला फारच उशीर झालेला आहे. पाण्याची पातळी वाढली तर पुढच्या आठवड्यापासून हा साहसी खेळ सुरू करण्यात येईल.
- संध्या खाडीलकर, सरपंच, नगरगाव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.