

वाळपई : पर्यटन खाते, पर्यटन महामंडळ आणि सत्तरी तालुका समितीतर्फे आयोजित शासकीय पातळीवरील शिगमोत्सव शोभायात्रेत सहभागी गोव्यातील आघाडीच्या दोन रोमटामेळ पथकांमध्ये पूर्ववैमनस्यातून अचानक वाद निर्माण होऊन मारामारी झाली. यात तिघेजण जखमी झाले असून, त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, हा वाद शिगमोत्सव समितीने योग्य प्रकारे हाताळल्यामुळे शोभायात्रा शांततेत पार पडली.
ज्या दोन रोमटामेळ पथकांमुळे वाळपई येथील शोभायात्रेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, त्या दोन्ही पथकांना भविष्यात वाळपई येथे होणाऱ्या शोभायात्रेत प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय समितीने घेतला असून, त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. तसेच, वाद निर्माण होऊनही हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिगमोत्सवप्रेमींनी पहाटेपर्यंत संयम राखून सहकार्य केल्याबद्दल समितीने सर्वांचे आभार मानले.
याबाबतची माहिती अशी की, १६ मार्च रोजी वाळपई येथे शासकीय पातळीवर शिगमोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात समितीचे अध्यक्ष विश्वजीत राणे यांच्या हस्ते, तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आली. सुरुवातीला रोमटामेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सुरळीत सुरू असताना अनेक पथकांनी प्रभावी सादरीकरण केले.
दरम्यान, गोव्यातील आघाडीच्या दोन रोमटामेळ पथकांतील कलाकारांमध्ये अचानक वाद निर्माण झाला. या वादामुळे येथील आवरलेडी हायस्कूलसमोर दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा वाद मारामारीत परिवर्तित झाला. या मारामारीत तिघेजण जखमी झाले असून, त्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते.
या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी शोभायात्रा खंडित करण्याचा सल्ला दिला होता; मात्र समितीने त्यास तीव्र आक्षेप घेतला. हा वाद दोन रोमटामेळ पथकांमधील असून त्याचा आयोजन समितीशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिगमोत्सवप्रेमींचा उत्साह कमी होऊ नये म्हणून मिरवणूक बंद न करण्याचा निर्णय समितीने घेतला. संबंधित दोन्ही गटांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी, अशी विनंतीही समितीने केली.
हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिगमोत्सवप्रेमींच्या उत्साहाची दखल घेऊन समितीने जबाबदारी स्वीकारत पुन्हा एकदा रोमटामेळ स्पर्धेला सुरुवात केली. वाद निर्माण झाला तेव्हा एकूण आठ गटांचे सादरीकरण पूर्ण झाले होते, तर तीन पथकांचे सादरीकरण बाकी होते. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि उर्वरित पथकांची सादरीकरणे पूर्ण करून स्पर्धेचा समारोप यशस्वीपणे करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांनी पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे; मात्र यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.