
वाळपई : गावकरवाडा- होंडा येथील रस्त्याची अवस्था दयनीय बनली आहे. सध्या पावसामुळे येथील खड्ड्यांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
कतीच पार पडलेली गणेश चतुर्थी याच रस्त्यांवरून लोकांनी कशीबशी साजरी केली. येथे लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा आहे तशीच परंपरा गावकरवाडा येथे नवरात्रीला आहे. माता सरस्वतीची नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने, जल्लोषात पूजा केली जाते.
दसऱ्याच्या दिवशी सरस्वती विसर्जनावेळी प्रत्येक वाड्यावर भजनाची मैफल रंगते. पौराणिक कथेवर आधारित देखावे केले जातात. रस्त्यावर रांगोळी काढण्यात येते. महिला मंडळातर्फे दिंडीचे आयोजन असा सुंदर नजराणा पहावयास दूर दूरहून लोकांची पाऊले गावकरवाड्यावर वळतात. परंतु यंदा रस्त्याची चाळण झाली असल्याने रांगोळी कुठे काढावी आणि दिंडीसाठी फेर कुठे धरावा, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
जीव मुठीत घेऊन प्रवास
गणेश चतुर्थीपूर्वी प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे काही काळासाठी बुजविले होते; परंतु पावसाचा जोर ओसरला आणि वाहनांच्या वर्दळीमुळे खड्डे पुन्हा उखडले गेले. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहनचालकांसह प्रवाशांनाही आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
नवरात्रीपूर्वी डागडुजी करा!
या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. काही वाहने खराब रस्त्यामुळे बंद पडतात, तर काहीजण खड्ड्यांमुळे जायबंदी होतात. या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असून रस्त्याच्या कडेने पायी चालत जाणेसुद्धा जिकिरीचे बनले आहे. अशा या बिकट रस्त्याची दुरुस्ती नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी करावी, यासाठी स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.