

वाळपई: वाळपई नगरपालिकेच्या शहर क्षेत्रात दिवसेंदिवस कचरा टाकण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने मान्सूनपूर्व कामांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा टाकला जात असून काही ठिकाणी घरांमधील सांडपाणीही थेट गटारात सोडले जात आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले व गटारे स्वच्छ ठेवण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर उभे राहिले आहे.
मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून नगरपालिकेकडून काही भागांमध्ये गटारे स्वच्छ करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. वाळपई बाजारातील ठाणे मार्ग आणि पालिका मैदान मार्गालगतच्या गटारांमधील कचरा काढण्यात आला आहे. काही ठिकाणी गटारे उघडून त्यातील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात आला असला तरी शहरातील अनेक भागांत अद्यापही गटारांमध्ये प्लास्टिक कचरा साचलेला दिसत आहे.
काही गटारे उघड्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. गटारे झाकलेली नसल्यामुळे नागरिकांकडून त्यामध्ये कचरा टाकण्याचे प्रकार वाढत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित सर्व गटारांवर लाद्या घालून ती पूर्णपणे बंद करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
घरांमधील सांडपाणी थेट गटारांमध्ये सोडले जाणे ही गंभीर समस्या बनली आहे. यामुळे गटारे तुंबण्याबरोबरच दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे. मान्सूनपूर्व कामांच्या अनुषंगाने अशा घरांचे सर्वेक्षण करून सांडपाणी थेट गटारात सोडण्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.