Valpoi: ताडपत्रीखाली भरतो बाजार, रस्त्यांवर खड्डे, वाहतुकीचा गोंधळ; वाळपईला भेडसावतात ज्वलंत समस्या

Valpoi City Problems: वाळपई बाजारपेठ ते पणजी मार्गावर सत्तरी बझार आस्थापनापासून पालिका प्रशासकीय कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने पार्किंग केलेली असतात.
Valpoi goa
Valpoi ProblemsDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई मुख्य बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या अधिकच सतावणुकीची ठरत आहे. विशेष करून आठवडा बाजाराच्या दिवशी वाहतूक समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. मुख्य बाजारपेठेत प्रचंड प्रमाणात वाहनांची ये - जा वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

शहरात पूर्वी जेवढी बाजारासाठी जागा होती, तेवढीच आजही आहे. मात्र, सध्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यात भर म्हणून बेशिस्तपणे दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग करून ठेवली जात असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

वाळपई बाजारपेठ ते पणजी मार्गावर सत्तरी बझार आस्थापनापासून पालिका प्रशासकीय कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने पार्किंग केलेली असतात. दुचाकी, चारचाकी, प्रवासी गाड्यांचा त्यात समावेश असतो. रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करून ठेवली जात असल्याने वाहतुकीस रस्ता कमी पडत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीतून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे.

अनेक वर्षांपासून रस्त्यांचे रुंदीकरणच झालेले नाही

१.वाळपईत पूर्वीपासून जे रस्ते आहेत, तेच आजही आहेत. वाढत्या वाहनांच्या संख्येनुसार किंवा वाहतुकीनुसार रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही.

२.रस्त्यालगतच दोन्ही बाजुला घरे, दुकाने अनेक वर्षांपासून आहेत. त्यामुळे आहे त्याच रस्त्यातून वाहनचालकांना वाहने हाकावी लागतात.

३.पूर्वी वाहने कमी होती, पण बदलत्याकाळात वाहनांची संख्या दहापटीने वाढलेली आहे. ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

४.वाढती वाहनांची संख्या व वाळपई शहरातील कमी जागा अशा अवस्थेत या सुचनांचे पालन वाहनचालकांकडून होणे कठीण आहे.

‘पे पार्किंग’ची व्यवस्था व्हावी

आजच्या घडीला प्रत्येक घरात लहान, मोठ्या अशा किमान दोन - तीन गाड्या असतात. प्रत्येकजण बाजारासाठी वाहन घेऊन वाळपईत येत असतो. अशावेळी वाहनांची ये - जा प्रचंड वाढलेली आहे. लोक नोकरीसाठी जाताना वाळपईत रस्त्यालगत दोन्ही बाजुंना सकाळी आपल्या दुचाकी ठेवून जातात, त्या रात्रीपर्यंत तेथेच असतात. त्यामुळे रस्त्यामधून वाहने नेताना वाहनचालकांना कसरत करत वाहने हाकावी लागतात. त्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. ‘पे पार्किंग’ केल्यास बेशिस्त वाहने पार्क करून ठेवण्यावर नियंत्रण येण्यास मदत होऊ शकते. एकूणच वाळपईत सध्या वाहतूक कोंडीची तीव्र समस्या जाणवत आहे.

शहरात दर्जात्मक रस्त्यांचा अभाव

वाळपई - पणजी हा नव्याने केलेला मुख्य रस्ता सध्या बऱ्याच ठिकाणी खचलेला आहे. पालिका प्रशासकीय इमारतीजवळ असलेल्या वडाकडील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. हातीकडे, नुहा पेट्रोल पंपजवळील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.

त्यामुळे रस्त्यांचा दर्जा खालावलेला आहे. नवीन केलेला रस्ता काही महिन्यांतच खड्ड्यांनी व्यापत आहे. परिणामी वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे निकृष्ठ दर्जाचे रस्ते बांधले जात आहेत. रस्ता कामात अत्यंत बेजबाबदारपणा दिसून येत असून रस्ता कामांचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे.

वाळपई शहर पालिका क्षेत्रातील वेळूस येथे सध्या रस्त्याची दयनीय अवस्था बनलेली आहे. त्यामुळे वाहन चालकांना हा रस्ता त्रासदायक ठरलेला आहे. या भागात उन्हाळी हंगामात भूमिगत वीज केबल घालण्याची कामे करण्यात आली होती.

रस्त्याच्या एका बाजूने जेसीबी यंत्रणेने खणून जमिनीतून वीज केबल घातलेल्या आहेत व नंतर जमिनी मातीचा भराव टाकून पूर्ववत केलेल्या आहेत, पण त्यानंतर वेळेत रस्ता दुरुस्ती केलेली नाही. या कामात योग्य नियोजनाचा अभाव झाल्याने आज रस्ता मात्र नादुरुस्त बनलेला आहे. भूमिगत वीज केबलच्या माध्यमातून वीज समस्या सोडविण्याचा सरकारचा चांगला प्रयत्न आहे, पण सध्या वेळूस येथील रस्त्याची दयनीय अवस्था सर्वांनाच डोकेदुखीची ठरली आहे.

वळूसमधील रस्ते भयानक स्थितीत

भूमिगत वीज केबल घालण्यापूर्वी योग्य नियोजन प्रशासन पातळीवर न झाल्याने वेळूस येथील अनेक रस्ते नादुरुस्त स्थितीत आहेत. सध्या पावसामुळे रस्ते चिखलमय बनले आहेत. रस्त्यांत मोठ मोठे खड्डे तयार झाल्याने या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून रहाते. परिणामी दुचाकीचालकांची त्रेधातीरपीट उडते. काही दुचाकीचालक पडून किरकोळ जखमीही झाले आहेत. रात्रीच्यावेळी दुचाकी चालक अगदी जीव मुठीत धरून वाहन चालवितात. सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे आज वेळूस भागातील रस्त्याची स्थिती भयानक बनली आहे.

नवीन रस्त्यांचे आयुष्यमान किती?

नवीन हॉटमिक्स केलेले रस्ते किती वर्षे टिकतात? त्यांचे आयुष्यमान किती याचा काहीही ताळमेळ राहिलेला नाही. नवीन केलेले हॉटमिक्स रस्ते काही महिन्यातच खचून जातात. अनेक ठिकाणी खड्डे पडतात. त्यामुळे नवीन रस्त्यांना किती काळाची ‘व्हॅलीडीटी’ आहे असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. नवीन केलेले रस्त्यांत या ना त्या काराणाने खोदाई केली जाते. त्यामुळे रस्ते खराब होतात. सार्वजनिक कामात नियोजनाची अत्यंत गरज आहे.

ताडपत्रीखाली भरतो आठवड्याचा बाजार!

वाळपई शहरात मंगळवारी भरणाऱ्या आठवड्याच्या बाजाराला व्यापारी तसेच ग्राहकांची मोठी गर्दी होत असते, पण हा बाजार रस्त्यावर ताडपत्रीखाली भरत आहे हे वाळपईच्या वैभवातील एक दुर्दैव्यच. पालिकेने नवीन जागा शोधून व्यावसायिकांना सुसज्ज बाजार संकुल बांधून देण्यासाठी प्रयत्न करणे जरूरीचे आहे. ताडपत्रीखाली भरणाऱ्या या बाजारात व्यावसायिक तसेच ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. ताडपत्रीतून गळणाऱ्या पावसाच्या पाण्यात भिजत ग्राहकांना बाजार करावा लागत आहे.

Valpoi goa
Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

शहरात भटका गोवंश त्रासदायक..!

वाळपईत दिवसेंदिवस भटक्या गोवंशाची समस्या जटीलच होत चालली आहे. याआधी वाळपई भागात गोवंश चोरी होण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. वाळपई शहरात चोवीस तास रस्त्यावर भटका गोवंश आढळून येतो. कदंब बसस्थानक समोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गोवंश रस्त्यावर बसलेला असतो. अशावेळी वाहनचालकांना त्रासादायक ठरत आहे. विशेष म्हणजे वाळपईच्या मंगळवारच्या आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी ग्राहक व व्यावसायिकांना या मोकाट गुरांचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

Valpoi goa
Valpoi: वाळपईतील रुग्णांसाठी 'फिजिओथेरपी' वरदान, वर्षभरात शेकडो रुग्‍णांना लाभ; 3200 उपचार सत्रांचे आयोजन

परप्रांतीय मासळी विक्रेत्यांमुळे दुर्गंधी

वाळपई पालिकेतर्फे स्वतंत्र मासळी मार्केट बांधलेले आहे. स्थानिक मासळी विक्रेत्यांना चांगली जागा मिळालेली आहे, पण मंगळवारी बाजारात परप्रांतीय व्यावसायिक चक्क फळ, भाजी विक्रत्यांच्या बाजूलाच सुकी, ओली मासळी विक्री करतात. त्यामुळे लोकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते आहे. मासळी विक्रेत्यांना स्वतंत्र व्यवस्था असूनही बाहेरील व्यावसायिक या ठिकाणी येऊन मासळी विक्री करीत आहेत. त्याचा त्रास अन्य ग्राहकांना होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com