

वाळपई: वाळपई येथील सामाजिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) झालेल्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे माळोली-सत्तरी येथील ११ वर्षीय गौरव सावर्डेकर याला आपला एक पाय गमवावा लागला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आरोग्य विभागाने सीएचसी वाळपईच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. यवंती गावडे यांना तत्काळ निलंबित केले असून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गौरवच्या कुटुंबाला त्यांच्या वैयक्तिक ट्रस्टतर्फे २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत. यासंदर्भात, आरोग्यमंत्री राणे म्हणाले, कोवळ्या मुलाचा पाय परत मिळवून देता येणार नाही. पैसे ही केवळ मदतीची बाब आहे; मात्र या मुलाचे भवितव्य सुरक्षित करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मी आमदार म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून या कुटुंबासोबत ठामपणे उभा आहे. या प्रकरणात कोणाचाही निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.”
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव सावर्डेकर हा २७ एप्रिल रोजी सायकल चालवत असताना पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ वाळपई सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले. एक्स-रे तपासणीत फ्रॅक्चर असल्याचे निदान झाल्यानंतर त्याच्या पायाला प्लास्टर करून घरी पाठविण्यात आले.
मात्र, दुसऱ्याच दिवशी गौरवला तीव्र वेदना, अस्वस्थता आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याला पुन्हा वाळपई सीएचसीमध्ये आणण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले. तेथे अनेक तपासण्या आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या; मात्र उपचारांनंतरही पायाची स्थिती सुधारली नाही. अखेरीस १ मे रोजी डॉक्टरांना गौरवचा गुडघ्याखालील भाग कापावा लागला होता.
गौरवचे वडील गोपाळ सावर्डेकर यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. गौरव १८ वर्षांचा झाल्यानंतर त्याला सरकारी नोकरी द्यावी, अत्याधुनिक कृत्रिम पाय बसवून द्यावा तसेच वाढत्या वयानुसार दर एक-दोन वर्षांनी नवीन कृत्रिम पाय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिक्षण, उपचार आणि पुनर्वसनासाठी संपूर्ण शासकीय मदत मिळावी, अशी भावनिक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.