वाळपई: वाळपई नगरपालिका मैदानासमोर मध्यवर्ती ठिकाणी असलेले बालभवन केंद्राच्या इमारतीची सध्या दुर्दशा झाली असून इमारत जीर्ण झाल्यामुळे धोक्याची बनली आहे. कौले फुटल्याने पावसाचे पाणी थेट वर्गात पडते. परिणामी पाणीच पाणी होऊन शिक्षकांना पाण्यातच वर्ग घ्यावे लागत आहे. जीर्ण इमारत झाल्यामुळे मुलांच्या जीवाला धोका संभवतो, त्यामुळे दुरुस्ती गरजेची आहे.
सदर इमारतीत ४०-५० वर्षापूर्वी वाळपईतील सरकारी प्राथमिक शाळा येथे होती. त्यानंतर वाळपई भागशिक्षणाधिकाऱ्यांची नवी इमारत झाल्याने ती प्राथमिक शाळा या इमारतीत हलविण्यात आली होती. त्यानंतर जेव्हा राज्यात बालभवनची स्थापना होऊन सत्तरी तालुक्यात बालभवन केंद्र आले.
तेव्हा वाळपईतील याच इमारतीत बालभवन सुरु करण्यात आले, ते आजतागायत याच इमारतीत सुरू आहे. मध्यंतरी या इमारतीत उर्दू शाळाही चालायची. सकाळच्या सत्रात शाळा तर दुपारनंतर बालभवन, असे सत्र सुरू होते. त्यानंतर उर्दू शाळा अन्यत्र हलविण्यात आले,पण ४० वर्षांपासून याच ठिकाणी बालभवन आहे.
पूर्वी सत्तरी तालुक्यातील सर्व मुले याच बालभवनचा लाभ घ्यायची. मात्र, आता प्रत्येक पंचायतीत बालभवन केंद्र झाल्यामुळे काही प्रमाणात मुलांची संख्या कमी झाली आहे. मात्र, आता सुध्दा दररोज ९०च्या वर मुले विविध कला शिकण्यासाठी येतात.
सुट्टीच्या दिवसांत तर बालभवन केंद्र गच्च मुलांनी भरलेले असते. या इमारतीत तीन वर्ग असून नृत्य, हस्तकला, चित्रकला, हार्मोनियम, तबला व इतर कला येथे शिकविल्या जातात. ग्रामीण भागातील मुलांना चांगले व्यासपीठ व वाव मिळत आहे. मात्र,या वर्गांची अवस्था दयनीय झाली आहे. बालभवनची दुरुस्ती व्हावी, याचा प्रस्ताव केंद्र प्रमुखांनी सरकारकडे सुपूर्द केला आहे.
इमारत अत्यंत जुनी असून कौले गेल्याने काही ठिकाणी पत्रे घातले आहेत. इमारतीच्या पाठीमागे शेजारच्या मालकीचे नारळाचे झाड असून सतत इमारतीवर नारळ, चुडते पडत असतात. यामुळेही कौलाचे सतत नुकसान होत आहे. काही वेळा वर्ग सुरू असताना नारळ पडतात. कौलाबरोबर, लाकडी वासे, व इतर पूर्ण वाळवी लागल्याने खराब झालेले आहेत. शिवाय पावसाचे पाणी वर्गात झिरपत असते, दरवेळी पाण्यातच वर्ग घ्यावे लागतात.
कोवळी मुले बालभवनमध्ये शिकण्यासाठी येतात, मात्र पावसाचे पाणी तुंबल्याने व कौले फुटल्याने वर्ग जलमय झालेले आहेत. या अवस्थेत मुले कशी शिकतील. इमारतीची अवस्था धोकादायक असल्याने मुलांच्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे सरकारने लक्ष दिले पाहिजे.
अनिरुध्द जोशी, वाळपई
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.