Valpoi News : सत्तरी तालुका एकेकाळी भातशेतीने बहरलेला असायचा. पण बदलत्या काळात भात किंवा अन्य शेती कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याला कारण सरकारतर्फे केला जाणारा स्वस्त धान्यपुरवठा. त्यामुळे दरमहा घरबसल्या स्वस्त दरात तांदूळ मिळत असेल, तर शेतात जायचेच कशाला, अशी शेतकऱ्यांची मानसिकता बनली आहे. शेती न कसण्याला वन्य प्राण्यांचा उपद्रव, अल्प मनुष्यबळ, वाढती मजुरीही कारणीभूत आहे.
सध्या कमी मनुष्यबळामुळे भात शेतीची कामे सुरळीतपणे करता येत नाहीत. त्यातच सरकारी नोकरीच्या प्रमाणात गेल्या 15 वर्षांत झालेली प्रचंड वाढ, यांमुळे कोणी मातीत हात घालायलाच तयार होत नाही. व्हाईट कॉलर जॉबमुळे मातीत हात घालणार कोण, शिवाय लज्जेपोटी शेतजमीन मोठ्या प्रमाणात पडिक आहे.
तिसरे कारण म्हणजे, शेतीच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? कारण वन्य प्राण्यांच्या लोकवस्तीतील आक्रमणाने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पेरलेले बियाणे उगवेल जरूर पण त्याचे दाणे माणसाच्या पोटात जातील, याचा भरंवसा नसतो. त्यामुळे सत्तरी तालुक्यात शेती कसणे कमी झाले आहे.
वन्य प्राण्यांचा उपद्रव, अल्प मनुष्यबळही कारणीभूत
पारंपरिक शेती टिकवण्यासाठी आपण कमी जागेत का होईना, शेती करायला पाहिजे. पुढील पिढीलाही यात गोडी निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी सरकारने रानटी जनावरांचा बंदोबस्त करायला हवा. तरच नवी पिढी शेतात उतरेल. सरकारचे धोरण कृतिशील हवे, केवळ कागदावर नको. रानटी प्राण्यांचा बंदोबस्त होत नाही, तोवर शेती फुलण्यास अडथळे येतच राहतील.
- हरिश्चंद्र गावस, करंझोळ-सत्तरी.
शेती टिकवण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतील. रानटी जनावरांचा उपद्रव रोखण्यासाठी, बागायतींच्या संरक्षणासाठी उपाययोजना करावी लागेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, नुकसानीच्या वेळी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. कृषी खाते आणि शेतकरी यांच्या संयुक्त भागीदारीतून हरित क्रांती घडवून आणणे सहज शक्य आहे.
- समीर गोवेकर, केरी-सत्तरी.
पारंपरिक शेती टिकण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सेंद्रिय खतांचा वापर करणे आणि रासायनिक खते टाळणे अत्यंत आवश्यक आहे. शेती करताना निसर्गाला अनुकूल आणि अनुरूप पद्धतीने कोणत्याही प्रकारची निसर्गाची हानी न करणे अत्यंत आवश्यक आहे. रानटी प्राण्यांचा प्रचंड त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे, त्याकडेही सरकारने लक्ष द्यावे.
- रघू गावकर, सावर्डे.
आम्ही एक हंगाम पारंपरिक भातशेती लागवड करतो. शेती करताना अनेक अडचणी येतात. पोषक वातावरणाचा अभाव, नैसर्गिक संकटे, रोग, कीडी यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेती ही सत्तरीची विशेष ओळख असलेली परंपरा आहे. पारंपरिक शेती वाचविण्यासाठी सरकारने योग्य धोरणे आखणे आवश्यक आहे. केवळ अनुदान न देता सरकारी अधिकारी शेताच्या बांधापर्यंत गेले पाहिजेत.
- सूर्यकांत गावकर, भुईपाल-सत्तरी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.