फातोर्डा: गोवा फॉरवर्ड पार्टीचे (जीएफपी) अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मांद्रेमधील काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पार्टी युतीचे उमेदवार दीपक कलंगुटकर यांच्या प्रचारात सहभाग घेतला. यावेळेस सरदेसाई यांनी मांद्रेमधील लोकांना कलंगुटकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. (Goa Forward Vijay Sardesai)
दरम्यान विजय सरदेसाई म्हणाले, गोवा वाचणार का विकले जाणार हे आगामी गोवा निवडणुकीच्या निकालावर ठरेल. दीपक कलंगुटकर यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, दीपक यांना निवडून द्या. ते मांद्रेचा विकास करतील याची मला खात्री आहे. बाकीचे सर्व उमेदवार याआधी निवडणूक लढले आहेत याकडे त्यांनी लोकांचे लक्ष वेधले.
लोकांना विश्वास आहे की काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पार्टी युती भाजपला (BJP) सत्तेतून बाहेर काढण्यास सक्षम आहे. गोव्यातील लोकांना हे समजले आहे की बंगाल आणि दिल्लीतील स्वार्थी राजकीय पक्ष येथे आले आहेत. त्यांच्यामुळे गोव्यात भाजपविरोधी मतांचे विभाजन होणार आहे. याचा थेट फायदा भाजपला होईल, असे सरदेसाई म्हणाले.
तृणमूल कॉंग्रेस बद्दल बोलताना सरदेसाई म्हणाले, तृणमूल काँग्रेस भाजपला आपला शत्रू समजत असेल तर त्यांनी प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या विरोधात उमेदवार का उभा केला नाही? मी भाजपला विरोध करत असतानाही तृणमूलने त्यांच्या सर्वात मोठ्या नेत्याला फातोर्ड्यात माझ्या विरोधात का उभे केले? सरदेसाई यांनी हे प्रश्न उपस्थित केले.
काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडलेले विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या अकार्यक्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित केले आणि मतदारांनी कोणाला मतदान करायचे याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे असे म्हटले. नवीन विमानतळ होत असल्याने, बऱ्याच लोकांचा गोवेकरांच्या जमिनीवर डोळा आहे. स्थानिकांच्या हक्कासाठी उभे राहून लढा देणारा नेता हवा. लोकांनी दीपक कलंगुटकर यांना एक संधी द्यावी, असे सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.