डिचोली: सध्या रानमेव्याचे दिवस असले, तरी यंदा पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे रानावनात उपलब्ध होणाऱ्या रानमेव्याच्या बहरावर काहीसा परिणाम झाला आहे. यंदा डिचोली बाजारातही अपेक्षेप्रमाणे रानमेवा येत नाही. सध्या चुरनांचा (तोरणे) बहर जवळपास संपुष्टात आला आहे. तर जांभूळ, करवंदे बाजारात येत असली, तरी त्याचे प्रमाण बरेच कमी आहे.
बाजारात जांभूळ, करवंदांचे प्रमाण कमी असल्याने ती महाग झाली आहेत. ग्रामीण भागात रानमेवा सहज उपलब्ध होत असला, तरी सध्या करवंदे आणि जांभूळ आदी सहज उपलब्ध होणाऱ्या रानमेव्यासाठी गावागावातील मुले, युवक-युवती आदी नागरिक रानावनात भटंकती करीत असल्याचे चित्र काही भागात दिसून येत आहे.
उकाडा असह्य झाला, की प्रत्येकाला रानमेव्याची आठवण होत असते. निसर्ग नियमानुसार उन्हाळ्यात साधारण एप्रिल महिन्यात रानमेवा बहरत असतो. आरोग्यवर्धक आणि गुणकारी असलेल्या रानमेव्याची वर्षातून एक-दोनदा तरी चव चाखण्याचा मोह प्रत्येकाला असतो. निसर्गाचा अनमोल ठेवा आणि गुणकारी असलेल्या रानमेव्याचे सध्या दिवस असले, तरी करवंदे, जांभूळ आदी रानमेवा काहीसा दुर्मिळ झाला आहे. अधूनमधून पडलेल्या अवकाळी पावसामुळे यंदा रानमेव्याच्या बहरावर काहीसा परिणाम झाल्याचा अंदाज आहे. चुरनांचा (तोरणे) बहर तर आता जवळपास संपुष्टात आला आहे.
औषधी अन् गुणकारी जांभळे
गुणकारी असलेली जांभळे मिळवण्यासाठी डिचोलीसह ग्रामीण भागातील युवक तर खटाटोप करीत असल्याचे दिसून येत आहे. जांभळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जांभळे खाल्ल्याने रक्तशुद्धी होते. मधुमेही रुग्णांसाठी जांभळे खाणे उपयुक्त असल्याचा दावा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जातो. जांभळापासून काही भागात दारूही गाळण्यात येते. तर करवंदांमध्ये मोठ्या प्रमाणात 'क' जीवनसत्व आणि कॅल्शियम असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.