Tuyem Hospital: प्रतिक्षा संपली! तुये इस्पितळात 12 वर्षांनी सुरू होणार बाह्यरुग्ण विभाग, 2 फेब्रुवारी रोजी होणार उद्‌घाटन

Tuyem Hospital OPD: २ फेब्रुवारीपासून तुये येथील सामाजिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे बांधलेल्या १०० खाटांच्या इस्पितळात १३ प्रकारच्या बाह्य रुग्ण सेवा सुरू होणार आहेत.
Tuyem Hospital
Tuyem HospitalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तुये येथे इस्पितळासाठी बांधलेल्या इमारतीत अखेर १२ वर्षांनी बाह्य रुग्ण विभाग सुरू होणार आहेत. २ फेब्रुवारीपासून तुये येथील सामाजिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे बांधलेल्या १०० खाटांच्या इस्पितळात १३ प्रकारच्या बाह्य रुग्ण सेवा सुरू होणार आहेत.

या इस्पितळाला ‘सरकारी इस्पितळ रुग्णालय व संशोधन केंद्र, तुये (गोमेकॉ संलग्न)’ असे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. इस्पितळ प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीस आरोग्य सचिव, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच आरोग्य सेवा संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा, उपलब्ध वैद्यकीय यंत्रणा, मनुष्यबळाची स्थिती तसेच प्रारंभी सुरू करता येणाऱ्या सेवा यांचा सखोल आढावा घेण्यात आला. सध्याची व्यवस्था व तयारी समाधानकारक असल्याने ही सुविधा २ फेब्रुवारीपासून नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, ही इमारत वापरात आणावी यासाठी पेडणे तालुका नागरिक कृती समिती व तुये इस्पितळ कृती समितीने साखळी उपोषणाचे हत्यार उगारले होते. हे इस्पितळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाशी सलग्न असल्याचा आदेश सरकारने त्यानंतर जारी केला होता. आता सरकार नियोजनानुसार हे इस्पितळ कार्यान्वित करणार आहे का यावर लक्ष ठेवण्यासाठी समितीने तालुक्यातील नागरिकांचा समावेश असलेली समिती गठीत केली आहे.

आता आमरण उपोषण ३१ जानेवारीनंतर

तुये हॉस्पिटल कृती समितीचा नियोजित आमरण उपोषणाचा कार्यक्रम आता ३१ जानेवारीपर्यंत पुढे ढकलला आहे. सरकारने तुये हॉस्पिटल ३१ जानेवारीऐवजी २ फेब्रुवारी सुरू करणार असल्याचे जाहीर केल्याने समितीतर्फे हा निर्णय घेतला आहे. समितीचे निमंत्रक लोबो यांनी कळविले आहे. समितीच्या सर्व मागण्यांवर सरकारने ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा. अन्यथा, समितीचे सदस्य आमरण उपोषण करतील. २७ जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली होती. आता जानेवारीनंतर उपोषण करण्यात येणार असल्याचे समितीने कळवले आहे.

हे विभाग होणार सुरू

प्रारंभी टप्प्यात या रुग्णालयात एकूण १३ बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यामध्ये औषधोपचार, शस्त्रक्रिया, अस्थिरोग, स्त्रीरोग, दंतचिकित्सा, नेत्ररोग, बालरोग, आयुर्वेद, फिजिओथेरपी, मानसोपचार, कान-नाक-घसा, रेडिओलॉजी तसेच त्वचारोग विभागांचा समावेश आहे. या सर्व विभागांमधील वैद्यकीय सेवा गोवा वैद्यकीय महाविद्यालय तसेच आरोग्य सेवा संचालनालयातील अनुभवी डॉक्टरांमार्फत दिल्या जाणार आहेत.

मनुष्यबळ व साहाय्यक सेवा सज्ज

रुग्णसेवेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये परिचारिका (नर्सेस), बहुउद्देशीय कर्मचारी, सुविधा व्यवस्थापन व स्वच्छता सेवा कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आदींचा समावेश आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच रुग्णांना सुसंगत व सुलभ सेवा मिळणार आहे.

संशोधन केंद्राचीही उभारणी

येथील ही सुविधा केवळ उपचारापुरती मर्यादित न ठेवता, भविष्यात संशोधनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याच अनुषंगाने येथे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र तसेच अन्य नामांकित संशोधन संस्थांच्या सहकार्याने प्रगत आरोग्य संशोधनासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यातील आरोग्य संशोधनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tuyem Hospital
Tuyem Hospital: तुये इस्‍पितळात होणार 12 ‘ओपीडीं’चा समावेश! आरोलकरांची ग्‍वाही; लवकरच गोमेकॉशी होणार लिंक

चार महिन्यांत ‘ऑपरेशन थिएटर्स’

रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्ष कार्यान्वित करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून, येत्या चार महिन्यांच्या आत हे ऑपरेशन थिएटर्स सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यामुळे पुढील टप्प्यात अधिक व्यापक आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथेच शक्य होतील.

Tuyem Hospital
Tuyem Hospital: तुये येथील नवे रुग्णालय अखेर ‘गोमेकॉ’शी संलग्न! देखरेख समितीसाठी होणार बैठक

पेडणेवासीयांसाठी दिलासा

पेडणे तालुक्यासाठी ही आरोग्य सुविधा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या इस्पितळाच्या सुरूवातीमुळे उपचारांसाठी नागरिकांना म्हापशातील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय किंवा बांबोळीच्या गोमेकॉत येथे जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास टळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com