
Adivasi Vidyarthi Sammelan At Ravindra Bhavan Margao
पणजी: आदिवासी कल्याण संचालनालय आणि युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे आदिवासी विद्यार्थी संमेलन येत्या सोमवारी (ता. ९) मडगावातील रवींद्र भवनमध्ये आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत आदिवासी कल्याण संचालनालयाचे दशरथ रेडकर यांनी दिली.
याप्रसंगी एस-एसटी आयोगाचे चेअरमन दीपक करमळकर, आदिवासी कल्याणच्या उपसंचालक वीरा नायक, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांची उपस्थिती होती.
रेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने प्रेरणा दिनावेळी ‘आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार’ दिला गेला नव्हता. त्यामुळे या संमेलनात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
ते पुढे म्हणाले, की या संमेलनात विद्यार्थ्यांना पर्यावरणावर मार्गदर्शन करण्यासाठी सत्तरी अरण्य वातावरण संशोधन संघटनेचे संशोधक डॉ. प्रणय वैद्य, सायबर गुन्ह्यांविषयी दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत या मार्गदर्शन करतील. याशिवाय या संमेलनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदिवासी समाजातील चारजणांचा सत्कार करण्यात येणार आहे. क्रीडा, कृषी, सामाजिक आणि संस्कृती या क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या चारजणांचा ‘आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
रेडकर म्हणाले की, आदिवासी कल्याण खात्याच्यावतीने तीन योजना ऑनलाइन सुरू होणार आहेत. विधवांच्या मुलांसाठी मदतनिधीची योजना ऑनलाइन सुरू होणार आहे. त्यात मुलांना प्रति महिना अडीच हजार रुपये वयाच्या अठरा वर्षांपर्यंत दिले जातात.
या संमेलनाचा शुभारंभ सकाळी ९.३० वाजता मुख्यमंत्री तथा आदिवासी खात्याचे मंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आमदार गणेश गावकर, आमदार आंतानियो वाझ, गोवा राज्य आदिवासी आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन वासुदेव मेंग गावकर, एससी-एसटी आयोगाचे चेअरमन दीपक करमळकर, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांची उपस्थिती राहणार आहे.
कृषी क्षेत्रासाठी धारबांदोडा येथील रेशम गावकर, क्रीडा क्षेत्रासाठी नेत्रावळी-सांगे येथील बाबू अर्जुन गावकर, संस्कृतीसाठी करमळी-तिसवाडी येथील भालचंद्र उसगावकर आणि सामाजिक क्षेत्रासाठी पारोडा-सासष्टी येथील उपासो गावकर यांना प्रज्ञावंत पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांना सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ व रोख एक लाख रुपये देण्यात येणार आहे.
दहावीतील पहिल्या श्रेणीतील पाच, बारावीत कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात सर्वोत्तम पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती दशरथ रेडकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.