
मुंबई: कोकण तसेच गोव्यात धावणाऱ्या ट्रेनमधून आता चारचाकी (कार) घेऊन प्रवास करता येणार आहे. ट्रेनमधून ज्या प्रकारे ट्रकची वाहतूक केली जाते त्याचप्रमाणे आता कारची देखील वाहतूक होणार आहे. विशेष म्हणजे या कारमधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. या गणेशोत्सवात प्रायोगिक तत्वावर मुंबई ते गोव्या दरम्यान ही सुविधा सुरु करण्याचा मानस कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
गणेश उत्सवासाठी कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या गणेश भक्तांना मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तसेच, महामंडळाच्या बससेवा आणि ट्रेनला ऐनवेळी बुकिंग मिळत नसल्याने गैरसोय होते. त्यामुळे कोकणवासीयांना आणखी एक पर्याय म्हणून कार ऑन ट्रेन ही सेवा सुरु करण्याचा विचार कोकण रेल्वेच्या वतीने केला जात आहे. सध्या केवळ ट्रकच ट्रेनवरुन वाहून नेले जात आहेत. कार वाहतूक सुरु झाल्यास कोकणवासीयांना याचा फायदा होणार आहे.
सध्याचे वॅगन ट्रकच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आले आहेत, त्यामुळे काही तात्रिंक बाबींवर काम करण्याची गरज असल्याचे कोकण रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. खासगी वाहनांना ट्रेनच्या वॅगनवर प्रवेश देण्याबाबत सध्या विचार सुरु असून, येत्या गणपती उत्सवात सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल, असेही कोकण प्रशासनाने म्हटले आहे.
सध्या अशाप्रकारची सेवा कोलाड आणि मंगळुरु मार्गावर सुरु आहे. कोलाड येथे वाहनांना लोड केले जाते. वाहनातील ड्रायव्हर, क्लिनर (असल्यास) आणि इतरांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा लागतो. वॅगनवरील सुविधा सध्या फक्त ट्रकसाठी तयार करण्यात आल्याने कारसाठी ती अद्यावत करावी लागणार असल्याने त्याला काही वेळ लागणार आहे. दरम्यान, कोकण मार्गावर हा प्रयोग यशस्वी झाल्यास प्रवाशांना फायदा होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.