फोंडा: राज्यातील सहकार चळवळ अधिकाधिक प्रगल्भ होण्यासाठी सर्व सहकारी संस्थांचे व्यवहार सूत्रबद्ध करण्याबरोबरच येत्या सहा महिन्यांत राज्यात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी जाहीर केले.
फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आज (शनिवारी) सहकार भारतीच्या सातव्या अधिवेशनात सहकारमंत्री शिरोडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राज्यातील सहकार चळवळ अधिकाधिक वाढली पाहिजे आणि युवा कार्यकर्त्यांचा सहभाग या चळवळीत असायला हवा, यावर त्यांनी भर दिला.
यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ तसेच सहकार भारतीचे गोवा प्रदेशाध्यक्ष प्रकाश वेळीप, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक आदी उपस्थित होते.
मंत्री फळदेसाई यांनी सहकार चळवळीतून रोजगाराला चालना देण्यासाठी सहकारातील संस्थांनी प्रयत्न करायला हवेत, असे नमूद करताना सहकार चळवळ ही सीमित न राहता सर्वदूर पोचली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
दीनानाथ ठाकूर यांनी पुढील काळ हा सहकाराचा असेल, असे सांगून सहकार चळवळ देशाला महागुरू बनवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल, असे सांगितले. गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी सहकार चळवळीमुळे राज्यातील एका मोठ्या घटकाला रोजगार मिळाल्याचे नमूद करून सहकार चळवळ थांबता कामा नये, ती वाढली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
यावेळी सहकार चळवळीतील संस्थांचा गौरव करण्यात आला. अधिवेशनाचे निमंत्रक राजकुमार देसाई यांनी स्वागत केले. सहकार क्षेत्रातील वाटचालीसंबंधी प्रकाश वेळीप यांनी भाष्य केले. अशोक गावडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमापूर्वी नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या हस्ते सहकार ध्वजारोहण करण्यात आले.
सहकार चळवळीतील विविध संस्था, पतसंस्थांचे व्यवहार सूत्रबद्धरीत्या होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. एखादी पतसंस्था नुकसानीत गेली तर लोकांचा पैसा बुडण्याचा धोका असतो. त्यामुळेच हे व्यवहार जर सूत्रबद्धरीत्या आणि पारदर्शक झाले तर राज्यातील सहकार चळवळ निश्चितच वाढेल आणि लोकांचा पैसाही सुरक्षित राहील.
- सुभाष शिरोडकर, सहकारमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.